कोथरूडमधील पराग म्हेत्रे याला पोर्तुगालमध्ये झालेल्या केटलबेल स्पर्धेत रौप्य पदक

पोर्तुगालमध्ये झालेल्या केटलबेल स्पर्धेत भारताला रौप्य पदक
कोथरूड : केटलबेल या व्यावसायिक क्रीडा स्पर्धेत 74 किलो वजन गटात कोथरुडमधील पराग म्हेत्रे याने रौप्य पदक मिळवत भारताची मान उंचवली आहे .पोर्तुगालमध्ये झालेल्या वर्ल्ड केटलेबल स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवणारा पराग हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
क्लीन अँड जर्क इव्हेंटमध्ये 30 मिनिटे (नॉन स्टॉप) 32 किलो वजन 235 वेळा उचलून त्याने व्यावसायिक स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 2 क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. त्यामुळे पराग केटलबेल खेळात जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. वर्ल्डस केटलबेल स्पोर्ट्स इंडिया फेडरेशनच्या वतीने पोर्तुगालमध्ये झालेल्या स्पर्धेसाठी गौरांग आमडेकर, राजराजेश्वरी राजाराम या स्पर्धकांची निवड झाली होती.
केटलबेल हा मुळचा रशियन राष्ट्रीय खेळ असून या खेळाचा आणि त्यामुळे येणाऱ्या फिटनेस बाबत भारतभर प्रचार करण्याचे काम पराग म्हेत्रे करतो. माणसाची सहनशक्ती वाढवणारा, ताकद आजमावणारा हा खेळ आहे. पोर्तुगालमध्ये वर्ल्ड केटलबेल स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये परागने भारतासाठी रौप्य पदक मिळवले आहे. पोलंडने सुवर्ण तर स्पेनने कांस्य पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय खेळासाठी वर्ल्ड केटलबेल स्पोर्ट फेडरेशनने परागची आंतरराष्ट्रीय पंच” म्हणून निवड केली आहे. पंच म्हणून काम करण्याची संधी मिळालेला तो एकमेव भारतीय आहे.




