प्रशांत किशोर यांनी का नाकारली कॉंग्रेसची ऑफर; या मुद्द्यांवर झाले मतभेद

नवी दिल्ली : काँग्रेस नेतृत्वाशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेच्या आणि बैठकांच्या फेऱ्यांनंतर, राजकीय आखणीकार प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस पक्षप्रवेशाचे ‘आमंत्रण’ नाकारले. लोकसभा निवडणूक 2024, तसेच पक्षाच्या आगामी धोरणनिश्चितीसाठी नेमलेल्या उच्चाधिकार समितीत सहभागी होण्याचा प्रस्ताव काँग्रेसने किशोर यांना दिला होता. किशोर यांनी तो मान्य केला नाही. आता काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर मतभेद आहेत हे देखील समोर आले आहे.
काही राज्यांमध्ये इतर पक्षांसोबत करण्यात येणारी आघाडी तसेच पक्षाचं नेतृत्व राहुल गांधींकडे द्यावं की प्रियंका गांधींकडे यासारख्या मुद्द्यांवरुन मतभेद झाल्याने प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस प्रवेशासंदर्भात हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी प्रशांत किशोर यांच्या तीन बैठका झाल्या होत्या, त्यांची अखेरची बैठक शुक्रवारी झाली होती. त्यानंतर सोनियांनी सोमवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. मंगळवारीदेखील पक्षाच्या १५ रकाबगंज येथील वॉर रूममध्येही बैठक झाली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास नकार दिला असल्याची माहिती प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून जाहीर केली आहे.
प्रशांत किशोर यांनीदेखील स्वतंत्रपणे ट्वीट करून काँग्रेस प्रवेश न करण्याचे कारण स्पष्ट केले. काँग्रेसने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीचा सदस्य बनावे व निवडणुकांची जबाबदारी सांभाळावी असा प्रस्ताव दिला होता, पण तो नाकारला असल्याचे ट्वीट किशोर यांनी केले. ‘‘मला नम्रपणे वाटते की, माझ्यापेक्षा काँग्रेस पक्षाला भक्कम नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे. त्याद्वारे पक्ष संघटनेत आमूलाग्र बदल करता येईल,’’ असे ट्वीट करून किशोर यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
हेच ते महत्त्वाचे कारण
पक्षातील पद व जबाबदारी निवडणुकांच्या आखणीपुरती मर्यादित न ठेवता पक्षबांधणी व निर्णयप्रक्रियेमध्ये मोकळेपणाने काम करू देण्याची मागणी प्रशांत किशोर केली होती, मात्र पक्षामध्ये अमर्याद अधिकार न देता फक्त उच्चाधिकार समितीचे सदस्य या नात्याने पक्षसेवा करावी असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे किशोर यांनी काँग्रेसमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.
कॉंग्रेसचे नेतृत्व कोणी करावे?
पक्षाचं नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे देण्यासंदर्भात काँग्रेस ठाम असतानाच प्रशांत किशोर हे प्रियंका गांधींच्या नावावर ठाम होते. प्रशांत किशोर यांनी बिहार, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरबरोबरच इतर महत्वाच्या राज्यांमध्ये जुन्या मित्र पक्षांसोबत जाण्यासंदर्भात मांडलेली भूमिका आणि पक्ष नेतृत्वाबद्दल केलेली मागणी ही काँग्रेसला फारशी पटली नाही. काँग्रेसच्या कार्यकारी मंडळासमोर किशोर यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार आणि पक्षाध्यक्ष या दोन वेगळ्या व्यक्ती असाव्यात असं मतही व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.




