आमदार शंकर मांडेकर यांच्या पत्रानंतर पुणे महापालिकेकडून सुस हायवे ते सनी वर्ल्ड रस्ता रुंदीकरणास सुरूवात

पुणे : सुस हायवे ते सनी वर्ल्ड, रस्ता रुंदीकरण तसेच खिंडीचा चढ कमी करून रस्ता करण्याबाबत आमदार शंकर मांडेकर यांच्या पत्रानंतर सुस हायवे ते सनी वर्ल्ड, रस्ता रुंदीकरणास सुरूवात करण्यात आली आहे.
स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी याबाबत पुणे महापालिका आयुक्ताना पत्र दिले होते. याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

सुस गाव हद्दीतून सुस हायवे ते सनी वर्ल्डकडे जाणारा खिंड रस्ता हा परिसरातील महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे. सद्यस्थितीत या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून रस्ता अरुंद, उंच-चढाचा व खड्ड्यांनी भरलेला आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीची व अपघातांची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे.
या मार्गावर कॉलेज, हॉस्पिटल तसेच सुस परिसरातील गावे असल्यामुळे विद्यार्थ्यांची, रुग्णांची व ग्रामस्थांची मोठी वर्दळ कायम असते. तातडीच्या रुग्णवाहिका, सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनांना या खिंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.
सुस हायवे ते सनी वर्ल्ड दरम्यानचा रस्ता योग्य पद्धतीने रुंदीकरण करावा. तसेच सुस खिंडीतील तीव्र चढ कमी करून वाहतूक सुरळीत व सुरक्षित करावी. ही समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने या कामाकडे विशेष बाब म्हणून लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी. अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली होती.









