राज्यपालांची हकालपट्टी करा अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल : शरद पवार

राज्यपालांना शरम वाटली पाहिजे : शरद पवार
मुंबई: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल टिंगलटवाळी करताना राज्यपालांना शरम वाटली पाहिजे, असा संताप राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. अशी वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. मी लोकशाही मार्गाने सांगतो. त्यांची पदावरून हकालपट्टी करा. लोक शांत आहेत पण त्यांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा पवार यांनी केंद्र सरकारला दिला.
मुंबईतील महाविकास आघाडीच्या महामोर्चाला ते संबोधित करत होते. महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या संयुक्त विद्यमाने आज राज्यपाल व भाजप नेत्यांकडून सातत्याने थोर महापुरुषांचा होणार अपमान, सीमा वाद अशा विविध मुद्द्यांवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. लाखोच्या संख्येने लोक यात सहभागी झाले होते. मुंबईच्या रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा येथून या मोर्चाची सुरुवात झाली व शेवट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ करण्यात आला.

या महामोर्चाला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, खासदार सुप्रिया सुळे, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, सपाचे प्रमुख अबू आझमी, शिवसेना खासदार विनायक राऊत, खासदार चंद्रकांत खैरे आदींसह महाविकास आघाडीचे घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चाला संबोधित करताना पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राची फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सन्मानीय स्थानं आहेत. त्यांच्याबद्दल काहीही बोलले जात आहे. शंकरदयाळ शर्मांपासून अनेक राज्यपाल पाहिले. पण असा राज्यपाल पाहिला नाही. आजचे राज्यपाल महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात नेत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.
आज आपण लाखोंच्या संख्येने इथे का जमलोय तर महाराष्ट्राच्या सन्मानासाठी एकत्रित आलोय. आज ज्यांच्या हाती राज्याची सूत्र आहेत त्या सत्तेत बसलेले लोक महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल वेगळ्या प्रकारची भाषा वापरतात. देशात अनेक राजे रजवाडे होऊन गेले अनेकांची संस्थाने झाली पण साडेतीनशे वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या अंत:करणात एक नाव अखंड आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती महाराज. त्या शिवछत्रपतींबद्दल राज्याचा एखादा मंत्री, अन्य कोणी सत्ताधारी पक्षाचे घटक काही चुकीचे वक्तव्य करतात ते महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. या संबंधीची तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज आपण लाखोंच्या संख्येने इथे जमलो. आज जो इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला त्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना काय धडा शिकवायचा त्यासाठी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.
जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
महापुरुषांचा सन्मान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्रवासियांचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपल्या राज्यात महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रप्रेमी आले त्या सर्वांचे अजित पवार यांनी मनापासून स्वागत केले.
राज्याचा स्वाभिमान आणि अस्मितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठतो आणि आपले ध्येय साध्य केल्याशिवाय राज्य शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा मोर्चा असल्याचे अजितदादा म्हणाले. खरतर ही वेळ राज्यावर का आली तर महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य सातत्याने होत आहेत त्याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढावा लागला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मौलाना आझाद अशा अनेक महापुरूषांची नावांची यादी आहे ज्यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम, बेताल वक्तव्य करण्याचे काम कशामुळे सुरू आहे, यामागील मास्टमाईंड कोण आहे, हे का थांबत नाही, असे अनेक सवाल त्यांनी राज्य सरकारला केले.
पवार म्हणाले, माणसाकडून चूक एकदा होऊ शकते, चूक झाल्यास माफी मागतो ही राज्याची संस्कृती आहे परंतु सत्ताधाऱ्यांमध्ये तसे घडत नाही. राज्यपाल काही बोलले की त्यांच्यापुढे त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करतात, अशा लोकांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी, असे शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. तुम्ही राज्यकर्ते म्हणून बसले असताना संविधान, कायदा काय सांगतो हे पाहणे जरूरीचे असताना या सगळ्याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे, असा आरोप त्यांनी केला. या सर्व विरोधात जितक्या मोठ्या संख्येने राज्यातील जनसमुदाय इथे अवतरला आहे त्यातून राज्यकर्त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच यावेळी महापुरुषांचा होणार अपमान पाहाता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे, या सोबत जे आमदार दोषी असतील त्यांनाही हटवले पाहिजे अशी मागणी पवार यांनी केले. ही सर्व प्रवृत्तीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उद्याच्या अधिवेशनात वेळ पडल्यास कडक कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली. अशाप्रकारच्या बिलाला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील असेही ते म्हणाले.
बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील ८६५ मराठी गावे राज्यात आणण्याचा संघर्ष सुरू असताना राज्यातील गाव कर्नाटकात जाण्यास का सुरुवात झाली याचा राज्यातील नागरिकांनी विचार करायला हवा. आम्ही सत्तेत असताना अशा पद्धतीने कधीही भूमिका सीमाभागातील गावांनी घेतली नाही. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळे हे का घडले आणि कुणामुळे घडले याची स्पष्टता व्हायला हवी असे ते म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची भूमिका घेतात यावर पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबद्दल अनेक वक्तव्य केली त्यावर राज्य सरकारला काही वाटायला हवे, कर्नाटक सरकार सातत्याने आपल्यावर अन्याय करतेय. तुमचे पुतण्या मावशीचे प्रेम हे सगळ्यांना कळाले आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.



