‘थँक्यू टॅक्स पेयर’ फलकाद्वारे जनतेचे आभार ; राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा उपक्रम

करदात्यांचे श्रेय स्वतः घेऊ पाहणाऱ्या ,भाजपा चा निषेध : गिरीश गुरनानी
पुणे : लसीचे डोस करदात्यांच्या पैशांवर खरेदी केले आहेत, असे असताना लसीकरणाच्या माध्यमातून राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. वास्तविक लसीकरणाचे विशेष योगदान पुनावाला यांचे आहे.तसेच कोरोना लसीकरण हे राष्ट्रीय अभियान आहे. रांगेत उभे राहून लस घेणाऱ्या जनतेच्या सहकार्याने हे अभियान शहरात पार पडत आहे. कर भरणाऱ्या जनतेच्याच पैशातून लस विकत घेऊन, बॅनर बाजी करणाऱ्या मोदी सरकारने श्रेय घेण्याचे कारण काय. खरेतर करदात्या जनतेचे आभार मानणे योग्य ठरेल. ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’ अशा शब्दात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर च्या वतीने सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी निषेध व्यक्त केला.
गिरीश गुरनानी म्हणाले, लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर देखील पंतप्रधान मोदी यांचा फोटो ठेऊन जाहिरातबाजी करणे योग्य नाही. या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोथरूड आणि डेक्कन परिसरात ‘थँक्यू टॅक्स पेयर’ असे फलक लावून जनतेचे आभार मानले आहेत.

भारतातील असहाय्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम मोदी सरकारने थांबवले पाहिजे. सत्ताधारी पक्षाच्या धोरणांमुळे आणि बेजबाबदारपणामुळेच जनता भरडली जात आहे. राष्ट्रवादी युवक काँगेस पुणे शहर चा सरचिटणीस म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो असे गिरीश गुरनानी म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या योग्य धोरणाने राज्यात आणि शहरात लसीकरण मोहिमेत सहकार्य मिळाले, परंतु त्याची जाहिरातबाजी करण्यात आली नाही. राजकीय भांडवल करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाला लस मिळवून देणे हिताचे ठरेल, असे गिरीश गुरनानी म्हणाले.



