पुणे शहर

पुण्यात एक सप्टेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ

पुणे : सीएनजीच्या वाढलेल्या दरानुसार रिक्षाच्या भाड्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी २१ रुपयांवरून २५ रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपयांवरून १७ रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. एक सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि प्राधिकरणाचे सचिव डॉ.अजित शिंदे यांनी सांगितले.

सीएनजीच्या दरात होत असलेली वाढ लक्षात घेऊन रिक्षा संघटनांनी केलेल्या मागणीनुसार २५ जुलैला रिक्षा भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी २३ रुपये, तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला पंधरा रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. मात्र, या दरवाढीबाबत रिक्षा संघटनांनी आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे त्याला स्थगिती देण्यात आली होती. रिक्षा दरवाढीबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुनर्विचार करण्यात आला. त्यातून नवी दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. सध्या रिक्षाच्या दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी २१ रुपये भाडे आकारणी केली जाते. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये आकारले जातात. नव्याने केलेल्या भाडेवाढीनुसार एक सप्टेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी २५ रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आकारण्यात येतील. म्हणजेच पहिल्या दीड किलोमीटरसाठी चार रुपये, तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी तीन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी याबाबत सांगितले, की सर्व रिक्षा संघटना आणि ग्राहक संघटनांशी चर्चा करून आणि खाटुआ समितीच्या शिफारशीनुसार रिक्षाच्या भाडेवाढीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे. दरवाढीनुसार रिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करण्यासाठी रिक्षा चालकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १ सप्टेंबरला रिक्षाच्या मीटरचे प्रमाणीकरण झालेल्या रिक्षा चालकांनाच दरवाढीनुसार भाडे आकारणी करता येईल.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये