लाखो कारसेवकांनी ‘मंदिर वही बनायेंगे ‘चा नारा देत दिलेला लढा शेकडो वर्षांनी यशस्वी झाला ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पुढाकारामुळे स्वप्न साकार : अश्विनीकुमार चौबे

पुणे : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत, हा क्षण देशवासीयांसाठी दीपोत्सवच आहे. प्रत्येकाला अयोध्येत साकारलेले श्रीराम मंदिर पाहण्याची उत्सुकता लागलेली आहे. लाखो कारसेवकांनी ‘मंदिर वही बनायेंगे ‘चा नारा देत दिलेला लढा शेकडो वर्षांनी यशस्वी झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे स्वप्न साकार होत आहे.असे प्रतिपादन टी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले.
अयोध्येत होत राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ या तीन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी चौबे यांच्या हस्ते झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, पंकज महाराज गावडे, पुरुषोत्तम महाराज पाटील, चैतन्य महाराज कबीर, प्रदीप गारटकर, अप्पा रेणुसे, विजय जगताप व कार्यक्रमाचे आयोजक संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ,आदी उपस्थित होते.
अश्विनीकुमार चौबे म्हणाले, प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेची उत्सुकता जगभरातील राम भक्तांना आहे. प्रभू श्रीराम म्हणजे आदर्श, संस्कृती आणि अखंड भारतवासीयांच्या मनामनातील भक्तीचा त्रिवेणी संगम आहे.



मुरलीधर मोहोळ प्रास्ताविक करताना म्हणाले, जगातील सर्वात सुंदर व भव्य मंदिरात रामलला विराजमान होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. पुणेकरांना डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी उपलब्ध करून देताना मला आनंद होतो आहे. अयोध्येत रामलला विराजमान होत असताना देशातील वातावरण राममय झाले आहे. शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे स्वप्न साकारत आहे, हा आपल्या सर्वांसाठी उत्साहाचा क्षण आहे.
मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी बिट द अनबिटेबल डान्स ग्रुपने केलेल्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.









