रेल्वेत मास्क पुन्हा बंधनकारक

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान पुन्हा एकदा मास्क (Face Mask) वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय कोविडसंबंधित मार्गदर्शन (Covid SoP) तत्त्वांचेदेखील पालन करणे बंधनकारक असणार आहे. याबाबत रेल्वेचे कार्यकारी संचालक (पॅसेंजर मार्केटिंग) नीरज शर्मा यांनी पत्र जारी केले आहे.
रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेंना कोविड SOP पाळण्याचे निर्देश दिले असून, नीरज शर्मा यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, प्रवाशांना मास्क घातल्यानंतरच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. त्यशिवाय ट्रेनमधून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्यावर अनेक निर्बंध रेल्वेतर्फे शिथील करण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी मास्कसक्ती नसल्याने प्रवासादरम्यान मास्क परिधान करणे बंद केले होते. मात्र देशाच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने रेल्वेने मास्क पुन्हा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.




