कोथरूड पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात ; अल्पना वरपे यांची मागणी..

कोथरुड : एकलव्य कॉलेज परिसरातील मैदानात नुकताच पोत्यामध्ये अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण झाले आहे. घटना घडलेल्या परिसरातील शिक्षण संस्थांची मैदाने व वर्दळ नसलेले रस्ते म्हणजे व्यसनी लोकांसाठी व जोडप्यांकरिता हा परिसर अड्डाच झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिला व मुलीमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोथरुड पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी केली आहे.
या संदर्भातील निवेदन अल्पना वरपे यांच्याकडून कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप यांना देण्यात आले. यावेळी भाजपा युवामोर्चाचे प्रदेश चिटणीस ॲड.गणेश वरपे, सिद्धेश कवडे, शुभम शेवाळे, प्रणव उभे, रोहित जाधव आदि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जगताप यांनी आम्ही दक्षच आहोत परंतु अजून योग्यत्या उपाययोजना केल्या जातील असे अश्वासन उपस्थितांना दिले.
डावी भुसारी कॉलनी परिसरातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कामासाठी संपादित केलेल्या व अर्धवट अवस्थेत पाडण्यात आलेल्या इमारतींमध्ये देखील असेच अनुचित प्रकार चालू असतात. कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधी पोलिसांनी याकडेही लक्ष देऊन कारवाई करावी व नियमित व कायस्वरुपी गस्त वाढवावी अशी मागणी वरपे यांनी यावेळी केली.




