६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न

६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा
पुणे : संस्कृती प्रतिष्ठान अध्यक्ष, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उद्घाटन आज दिमाखदार पद्धतीने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, माजी खासदार अशोक मोहोळ, राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, रवी अनासपुरे, अभिनेत्री दिपाली सय्यद, अभिनेते प्रवीण तरडे, विक्रांत पाटील, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर, संजय काकडे, विशाल गोखले आदी उपस्थित होते.
प्रत्येक जिल्ह्यातील शहरातील तालीम संघातील स्पर्धकांनी देखणे संचलन यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस बँडने यावेळी मानवंदना दिली. उद्घाटनालाच कुस्ती शौकिनांनी केलेली गर्दी पाहता शेवटच्या दिवशी अंतिम कुस्ती पाहण्यासाठी किती गर्दी होईल याचीच प्रचिती आज आली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी चे केलेले आयोजन पाहता असे नियोजन भूतो न भविष्य होणार नाही. प्रचंड मोठी व्यवस्था याठिकाणी केलेली आहे. प्रंचंड बक्षिसे या स्पर्धेत दिली जाणार आहे. यावेळी रामदास तडस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या मागण्या सरकारकडून पूर्ण केल्या जातील. १४ तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कुस्ती खेळाविषयी महत्वाच्या घोषणा करतील.
यावेळी बोलताना रामदास तडस म्हणाले, महाराष्ट्र केसरीचे असे आयोजन आधी कधी झालं नाही आणि पुढं होणार नाही. मामासाहेब मोहोळ कुस्तीवीराला मुलाप्रमाणे वागवत होते त्यांनी कुस्तीची परंपरा जपली आणि कुस्तीला चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र केसरी विजेत्याला पोलीस उपाधीक्षक पदी नोकरी देण्याची केवळ चर्चा झाली. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची पहिल्यांदा पोलीस उपअधीक्षक पदी नोकरी दिली. महाराष्ट्र केसरीचे मानधन वाढवून मिळाले पाहिजे अशी मागणी मी यावेळी करतो. महाराष्ट्राचा मल्ल ऑलिम्पिक मध्ये जावा अशी अपेक्षा असून ती लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा बाळगू
मुरलीधर मोहोळ म्हणाले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला याचा वेगळा आनंद आहे कारण यापाठीमागे फार मोठी परंपरा आणि इतिहास आहे. पूर्वी यात्रा आणि जत्रा एवढया पुरतीच कुस्ती मर्यादित होती. मामासाहेब मोहोळ यांनी कुस्तिगिर परिषदेच्या माध्यमातून स्पर्धेचे स्वरूप देता यावा यासाठी पुढाकार घेतला आणि त्याला महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून मूर्त स्वरूप प्राप्त झाले. कुस्ती समृध्द व्हावी, स्पर्धकांना चांगले दिवस यावेतकुस्ती वाढली पाहिजे, खेळ मोठा झाला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. स्पर्धा आयोजनाचे काम सुरू झाल्यानंतर मदतीचे असंख्य हात पुढे आले. त्यामुळे विजेत्यांना स्पर्धकांना रोख बक्षिसे, दुचाकी व चारचाकी गाड्या मिळणार आहेत.
संस्कृती प्रतिष्ठानचे वतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरवातीपासूनच चर्चेत आहे.







