मुळशीकरांचा आवाज कोथरूड मध्ये घुमणार

प्रभाग क्रमांक १०,११ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणार मुळशीकरांचा मेळावा
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोर–रायगड–मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी प्रभाग क्रमांक १०,११ या प्रभागाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणाऱ्या मुळशीकरांच्या मेळाव्याच्या अनुषंगाने नियोजन बैठक उत्सव मंगल कार्यालय, कोथरूड येथे माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर मधील केळेवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे तसेच प्रभाग क्रमांक 10 मधील अभिजित दगडे पाटील, शंकर केमसे, जयश्री मारणे आणि सुजाता भुंडे यांच्या प्रचारार्थ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दीपक मानकर यांनी बोलताना सांगितले की, “ संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण पूर्णपणे बदललेले आहे. स्वराज्य निर्मितीसाठी मुळशीतील मावळ्यांनी जशी छत्रपती शिवाजी महाराज यांना साथ दिली. तशीच पुण्याच्या निर्मितीसाठी शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार यांना साथ द्यावी. पुणे शहर आणि जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी विकासकामे केली आहेत त्याची पोचपावती मतदानाच्या स्वरुपात द्यावी. चांगले काम करणाऱ्या उमेदवाराच्या मागे मतदार हा उभा असतो.

भूकुम,भूगाव, वारजे,उत्तमनगर,शिवणे व आजूबाजूच्या परिसरात स्थलांतरीत झालेले मतदार तसेच आपले नातेवाईक, मित्र परिवार यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करावे असे आवाहन दीपक मानकर यांनी यावेळी केले.
मुळशीकरांचा हा मेळावा आगामी काळात पक्षासाठी निश्चितच बळ देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत मेळाव्याचे नियोजन, उपस्थिती, संघटनात्मक तयारी तसेच मुळशी तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुळशीकरांची भूमिका, विकासाच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे कसे काम करता येईल, यावरही सकारात्मक विचारविनिमय झाला. या नियोजन बैठकीचे आयोजन माजी सभापती बाबा कंधार, अंकुश मोरे आणि शांतारामदादा इंगवले यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी रवींद्र (बाबा) कंधारे, कालिदास गोपालघरे, शांताराम इंगवले, अंकुश मोरे, अंकुश उभे, धैर्यशील ढमाले, माऊली साठे यांच्यासह मुळशी तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



