
पुणे : भुसारी कॉलनी येथे जाऊन येतो असे सांगून गेलेला मुलगा संध्याकाळी उशिरा पर्यंत घरी परतला नसल्याने काळजीत पडलेल्या आईने जवळच्या लोकांकडे तपास केला. मात्र तो सापडत नसल्याने आईची काळजी आणखीच वाढली. शेवटी आईने कोथरुड पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रार घेतानाच मुलाच्या शोधासाठी पथक रवाना केले. संबधित मुलाला पाऊण तासात पोलिसांना शोधून काढून आईच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या तत्पर सेवेमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
कोथरुड मधील एकलव्य महाविद्यालया जवळ शिंदेवस्ती येथे राहत असलेल्या पुष्पा कांबळे ह्या खाजगी रुग्णालयात कामाला आहेत. कांबळे यांचा मुलगा शृंगेरी मठात जाऊन येतो. असे सांगून गेला मात्र पुढे बराच वेळ तो घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तो कुठेही सापडला नाही.
कोणाच्या तरी गाडीवर बसून गेल्याचे समजले यामुळे काळजी वाटू लागली. पुष्पा कांबळे यांनी कोथरुड पोलीस स्टेशन गाठले व घडलेला प्रकार सांगितला. पोलीस उपनिरीक्षक संतोष काजळे, पोलीस नाईक बाठे व काळे यांनी फिर्याद घेण्यास सुरुवात केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना मुलगा नुकताच चांदणी चौकाच्या दिशेने जाताना दिसले. लगेचच चांदणी चौकाच्या दिशेने तपास घेता मेडिकेअर दुकानापाशी मुलगा सापडला. त्याला विश्वासात घेऊन आईच्या हवाली केला. आई सतत रागावते म्हणून घरातून निघून गेलो असल्याचे १४ वर्षाच्या गणेश कांबळे याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आई व मुलगा यांना समुपदेशन करत घरी पाठवून दिले. पाऊण तासात मुलाचा शोध लावल्याने पोलिसांचे कोथरूडमध्ये कौतुक होत आहे.



