महापालिकेची ऑनलाईन तक्रार यंत्रणा केवळ दिखावा.. तक्रार सोडवण्यापूर्वीच केली जाते क्लोज ; कर्वेनगरमध्ये विचित्र अनुभव

पुणे : महापालिकेकडून नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी व त्या समस्या लगेच सोडवून संबधित नागरिकांना कळवण्यासाठी ऑनलाईन तक्रार यंत्रणा आहे. मात्र ही महापालिकेची ऑनलाईन तक्रार यंत्रणा केवळ फार्स असल्याचे समोर येत आहे. कर्वेनगर मधील नागरिकांना याबाबत विचित्र अनुभव येत आहेत.
या ऑनलाईन तक्रार यंत्रणेवर कोणी तक्रार दिल्यास त्याचे नाव गोपनीय राहणे आवश्यक आहे. पण तसे न होता तकार सोडवण्याएवजी तक्रारदाराचे नाव पालिकेचे कर्मचारी ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्याला सांगत असल्याने वादविवादाचे प्रसंग घडत आहेत. यातून एखादी घटना घडली तर त्याला पालिका अधिकारी संबधित कर्मचारी जबाबदार राहणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

या ऑनलाईन तक्रार यंत्रणेवर तक्रार टाकल्यास ती त्या भागातील संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांना पाठवली जाते व पुढे ती समस्या सोडवण्यासाठी प्रक्रिया चालू होते. ही प्रक्रिया सुरू झाल्यावर त्याच्या तक्रारीचा स्टेटस ऑन प्रोसेस असा दिसतो व तक्रार निवारण झाल्यास स्टेटस ला क्लोज दाखवले जाते म्हणजे समस्या सोडवली असा त्याचा अर्थ होतो मात्र कर्वनगर भागात समस्या सोडवण्याएवजी स्टेटस ला क्लोज दाखवले जात आहे. त्यामुळे ही यंत्रणा केवळ दिखावा आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोग्य विभागाशी संबधित असणाऱ्या तक्रारीवर वरील अनुभव नागरिकाला आला आहे, तसेच ऑनलाईन तक्रार केली असताना लेखी तक्रार द्या असे पालिका अधिकारी तक्रारदाराला सांगत असतात. लेखी तक्रार द्यायचीच आहे तर मग ऑनलाईन तक्रार यंत्रणा सुरू का केली असा प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रकारामुळे ऑनलाईन तक्रार केल्यानंतर सुद्धा कर्मचारी हितसंबंध जोपासत असल्याची चर्चा कर्वेनगर मध्ये सुरू आहे. ऑनलाईन तक्रार दिल्यानंतर तक्रारदाराचे नाव जाहीर करून वादविवाद झाले तर संबधित अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल केला जावा असे बोलले जाऊ लागले आहे.
ऑनलाईन तक्रार दिल्यानंतर तक्रारदाराचे नाव का जाहीर केले जात असेल, तक्रार न सोडवता ती सोडवली असे का दाखवले जात असेल, हे असं करण्यामागे कर्मचाऱ्यांचा काय हेतू असू शकतो असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
या संदर्भात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ आरोग्य निरिक्षकाशी बातचीत केली असता त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्याशी बोलून घ्या अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली तर या संदर्भात वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.












