मौर्यविहार सोसायटीचा रस्ता झाला खुला

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
कोथरुड: गेल्या १७ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या (kothrud)येथील मौर्यविहार सोसायटीच्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावत नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी येथील रहिवाशांना दिलेला शब्द पाळला आहे. दगडे यांच्या प्रयत्नांतून झालेल्या या रस्त्याचे व पुलाच्या कामाचे उदघाटन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास कोथरूड भाजप अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेविका अल्पना वरपे, नगरसेविका डॉ.श्रद्धा प्रभुणे-पाठक, वैभव मुरकुटे, बाळासाहेब टेमकर, विलास मोहोळ, विविध पदाधिकारी, मौर्य विहार सोसायटीचे चेअरमन, सभासद व नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
अन किरण दगडेंनी नागरीकांना दिलेला शब्द खरा करून दाखवला…
या परिसरात सहस्त्रबुद्धे गिरणीमार्गे मौर्यविहार कॉलनी आणि माणिकराव ठाकरे डीपी रस्त्यामध्ये नाला लागतो, तो ही केवळ रूंदी अडीचशे मीटर रुंदीचा. मात्र यामुळे मौर्यविहार व सहजानंदसह परिसरातील सत्तावीस सोसायट्यातील नागरिकांना अडीच किलोमीटरचा मोठा वळसा मारून कोथरूडकडे यावे लागत होते. धुणीभांडी करणाऱ्या कामगार महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक या नाल्यातूनच कशीबशी वाट काढत जात असायचे. नाल्यात घाणीचे साम्राज्य पसरलेले असायचे. तरीदेखील दररोजचा भाजीपाला, औषधे, किराणा आणण्यासाठी अडीच किलोमीटर वळसा मारण्यापेक्षा शॉर्टकट म्हणून नाक मुठीत धरून याच नाल्याचा उपयोग रस्ता म्हणून होत होता.

निवडणूकीच्या निमित्ताने किरण दगडे या भागात प्रचारासाठी गेल्यावर नागरिकांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्यांना विनवणी केली. त्यावेळी दगडे यांनीही हे काम करण्याचे वचनच नागरिकांना दिले होते. त्यासाठी आयुक्त, महापौर यांच्यासमवेत बैठक घेऊन रस्त्यात येणाऱ्या जागेचा बिल्डरला महापालिकेकडून टीडीआर मिळवून दिला. दगडे यांनी आपल्या बजेटमधून पन्नास लाखाची तरतूद केली. गेल्यावर्षी जानेवारीत त्याचे भूमिपूजन देखील करून घेतले. दगडे यांच्या या अशा पाठपुराव्यामुळे सगळे अडथळे दूर झाले. पूल आणि रस्ता आता स्वप्नातून सत्यात उतरल्याने दिलेला शब्द पाळणारे म्हणून दगडे यांचे नागरीकांनी भरभरून आभार मानत आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या. या पूलामुळे नागरिकांना अडीच किलोमीटरचा वळसा घालावा लागणार नाही. त्यासाठी वेळ, पेट्रोल आणि पैशाचीही बचत झाली आहे.






