योग गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनातून निरोगी आरोग्याचे रहस्य उलगडले.. कर्वेनगरमध्ये योग शिबिराचे आयोजन

कर्वेनगर : जागतिक योग दिनाचे औचित्य साधत कर्वेनगर मधील दुधाने लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेत योगाभ्यास केला. यावेळी योग प्रशिक्षकांकडून उपस्थितांना निरोगी आरोग्यासाठी योगा का आवश्यक आहे आणि तो कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी योग गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनातून निरोगी आरोग्याचे रहस्य उलगडत गेले.
श्री संत तुकाराम फाऊंडेशन, प्रविण माणिकशेठ दुधाने व राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा महिला अध्यक्षा तेजल मयुर दुधाने यांच्या वतीने भव्य योग शिबीराचे आयोजन कर्वेनगर येथे करण्यात आले होते.
या शिबिरासाठी अरविंद साळवे, योगगुरू शंकर आव्हाळे, निवास माळी, सुरेश भाग्यवंत,विठ्ठल कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. योग प्रशिक्षक उल्का अलकुंटे यांनी साधकांना निरोगी आरोग्यासाठी योग का आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. उल्का अलकुंटे यांच्यासह रेखा वर्मा, किशोरी वर्मा व मेघा यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले.

विविध योग आसने घेत उल्का अलकुंटे यांनी प्रत्येक आसनाचे महत्त्व पटवून देत योग शिबीर पार पाडले. या शिबिरामध्ये ११ वर्षाच्या नारायणी कडू व १६ वर्षाच्या सिद्धेश कडू या मुलांनी सादर केलेल्या योग प्रात्यक्षिकांनी उपस्थितांनी भारावून टाकले. आव्हाळे सर, माळी सर, कडू सर व भाग्यवंत सर यांनीही योग प्रात्यक्षिक सादर केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हे योग शिबीर उत्साहात पार पडले.



यावेळी बाळासाहेब बराटे , आनंद तांबे, चंद्रकांत पंडीत, रवींद्र कदम, रजनी पाचंगे, अंजली मराठे यांनीही सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सारिका सरकाळे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत प्रविण दुधाने यांनी व आभार तेजल दुधाने यांनी मानले.






