पुणे शहर

यंदा गणेशोत्सवात पुणेकरांना कोथरूडमध्ये अनुभवता येणार श्रीरामाची अयोध्यानगरी ; स्तंभ पूजनाचा सोहळा संपन्न..

साई मित्र मंडळ ट्रस्ट यंदा गणेशोत्सवात उभारणार श्रीराम मंदिराची प्रतिकृती..

पुणे : यंदा गणेशोत्सवात पुणेकर नागरिकांना प्रभू श्रीरामाची अयोध्यानगरी कोथरूडमध्ये अनुभवता येणार आहे. कोथरूड मधील श्री साई मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने यंदा अयोध्येत होत असलेल्या श्रीराम मंदिराची हुबेहूब भव्यदिव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या कामाचा स्तंभ पूजन सोहळा आज पौड रस्त्यावरील आनंदनगर चौकात मान्यवरांच्या हस्ते उत्साहवर्धक वातावरणात प्रभू श्रीराम व गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत पार पडला.

यावेळी श्री. साई मित्र मंडळाचे संस्थापक, माजी महापौर, मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक करताना मंडळाची माहिती दिली. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रविण दबडघाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वांजरवाडकर , शिरीष देशपांडे, भूपाल पटवर्धन, पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा, विशाल चोरडीया, अंकुश अजबे, अनिरुद्ध देशपांडे, सूर्यकांत काकडे, अमोल रावेतकर , करण तांबे, धर्मराज महाराज हांडे, चंद्रकांत महाराज वांजळे, संतोष महाराज पायगुडे, अभिनेते प्रविण तरडे, रमेश परदेशी, राजेश व्यास, गोविंद बेडेकर , रवी रबडे, वासंती जाधव, हर्षाली मथवड, कैलास सोनटक्के, नितीन सोनटक्के, प्रसनजित फडणवीस, तुषार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, मंडळाचे अध्यक्ष करण धुमाळ व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, कोथरूडमध्ये गणेशोत्सवानिमित्त उभे होत असलेल्या श्रीराम मंदिर प्रतिकृतीच्या स्तंभ पूजनाला उपस्थित राहता आले हे आमचं भाग्य आहे. हे मंदिर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. मी ही दर्शनाला येणार आहे. आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करूयात

डॉ. प्रविण दबडघाव म्हणाले, आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून श्रीराम मंदिर उभा राहत आहे याचा अभिमान वाटत आहे. आपल्या कोथरूडमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनातून श्री साई मित्र मंडळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची प्रतिकृती उभा करत आहे, ही आनंदाची बाब आहे. असच चांगल काम मंडळाकडून व्हावं या शुभेच्छा.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, श्री साई मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सव आणि त्याचवेळेस आयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर अंतिम टप्प्यात असणे हा आपल्या सर्वांसाठी अमृतयोग आहे. पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हा कोट्यावधी हिंदूंच्या मनातील स्वप्न साकार होणार आहे. साडेचारशेहून अधिक वर्षांच्या बंदीवासातून प्रभू श्रीराम मुक्त होणार आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेउनच आपण गेल्याच वर्षी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा साकारण्याचे जाहीर केलेले होते.

गेल्या वर्षी जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराची प्रतिकृती
आपण साकारली तेव्हा भाविकांना प्रत्यक्ष जेजुरीच्या मंदिरात असल्याची अनुभूती आलेली होती. राममंदिराचा देखावा साकारतांनाही याच अनुभूतीची प्रचिती यावी असे नियोजन झालेले आहे. आपल्या भागातील हजारो नागरिक अयोध्या आंदोलनात सक्रीय सहभागी झालेले होते. त्या प्रत्येकाच्यासाठी राम मंदिर हा आत्मियतेचा विषय आहे. आयोध्येत राम मंदिर उभे राहावे, यासाठी देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंनी अभूतपूर्व ऐक्याचे दर्शन घडविले.

राम मंदिर म्हणजे आपल्या जगण्याचा श्वास आहे, त्यांचे मंदिर हा आपल्यासाठी अलौकिक क्षण आहे. या सर्व भावनेचा विचार करुनच आपल्या गणेश उत्सवात राम मंदिराचा देखावा साकारण्याचा आम्ही निर्धार केला. हा देखावा प्रत्येक भाविकाला अयोध्येत घेऊन जाईल असा आम्हाला विश्वास असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये