कोथरूडमध्ये पदपथावरून चालणाऱ्या तीन शाळकरी मुलींना कारने चिरडले ; एकीची प्रकृती गंभीर

कोथरूड : कोथरूडमध्ये पदपथावर चालणाऱ्या तीन मुलींना भरधाव कारने चिरडल्याचा प्रकार घडला आहे. अपघातात तीन शाळकरी मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यातील एकीचे प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कारची चालक ही महिला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे.
हा भयंकर अपघात निंबाळकर बागेकडून कै. सुधीर फडके भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या गुळवणी महाराज रस्त्यावर गणेशनगर येथे रिव्हाइव्ह् हेअर अँड ब्युटी स्टुडिओ समोर घडला. गुळवणी महाराज रस्त्यावरून कार क्रमांक एम एच १२ , पी एन ६०६६ कर्नाटक विद्यालयाच्या दिशेने जात होती, त्यावेळी पद पथावरून तीन शाळकरी मुली चालत होत्या चालकाचा ताबा सुटल्याने कार वेगात पद पदावर चढली व चालणाऱ्या तीन मुलींना चिरडले. दोन मुली कराच्या धडकेने बाजूला फेकल्या गेल्या तर एक कार खाली सापडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
अपघात घडल्यानंतर तिन्ही मुलींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. भरधाव कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.

या संदर्भात अलंकार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी सांगितले की, महिला कार चालक पोलीस स्टेशनला हजार झाल्या असून मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.






