क्रीडा

ट्रिपल महाराष्ट्र केसरी एसीपी विजय चौधरी ५२ व्या हिंदकेसरीसाठी सज्ज

पुणे : विजय चौधरी हे सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून कार्यरत असून, प्रतिष्ठेच्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही मानाची स्पर्धा १४ ते १७ मे २०२६ दरम्यान सातारा जिल्ह्यात रंगणार आहे.

वयाच्या ३९ व्या वर्षीही विजय चौधरी यांनी पोलीस सेवेची जबाबदारी आणि तब्बल २४ वर्षांची दमदार कुस्ती कारकीर्द यांचा उत्कृष्ट समतोल साधला आहे. पूर्णवेळ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही ते दररोज कठोर सराव करत असून, कुस्तीप्रती त्यांची निष्ठा आणि जिद्द आजही कायम असल्याचे दिसून येते.

२०१४, २०१५ आणि २०१६ या सलग तीन वर्षांत महाराष्ट्र केसरी किताब पटकावत विजय चौधरी यांनी इतिहास रचला होता. ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा मान मिळवणाऱ्या मोजक्या मल्लांमध्ये त्यांची गणना केली जाते. राज्यातील बलाढ्य मल्लांना पराभूत करत त्यांनी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील यशानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचा झेंडा उंचावला. २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये स्पर्धेत भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी सुवर्णपदक जिंकून जागतिक विजेतेपदावर नाव कोरले.

स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांना हिंदकेसरी रोहित पटेल यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या देखरेखीखाली विजय चौधरी यांचा तांत्रिक, शारीरिक आणि रणनीतीपूर्ण सराव अंतिम टप्प्यात सुरू असून, यंदाच्या हिंदकेसरी स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार दिसून येत आहे.

पोलीस सेवेपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानापर्यंतचा विजय चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास आजच्या युवा पिढीसाठी आदर्श ठरत आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा गौरव वाढवत ५२ व्या हिंदकेसरी स्पर्धेत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

Img 20260222 wa00065926623401269940689

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये