CM Uddhav Thackeray : राजीनाम्यास तयार, मी घाबरणारा नाही, संघर्ष करणारी व्यक्ती : उद्धव ठाकरे

मुंबई : मी घाबरणारा नाही, मी संघर्ष करणारी व्यक्ती आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना म्हटलं आहे. मी लगेच राजीनामा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना माझ्याकडे उत्तर आहे. मी शिवसेनेचे नेतृत्व करायला लायक नाही. मी दोन्ही पद सोडायला तयार आहे. पण त्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे, दुसऱ्या पक्षाचा होणार असेल तर तसं नको. समोर या आणि सांगा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नका. मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो. जे गायब आहेत त्यांनी माझे पत्र घ्यावे. मी पुन्हा एकदा सांगतो हा अगदिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी नाही. मी आव्हानाला सामोरं जाणारा माणूस आहे, पाठ दाखवणारा नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जे काही मिळालं ते शिवसेनेमुळे हे लक्षात ठेवा
मला कशाचाही अनुभव नसताना मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीने मी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पुरा करणारच, असे मुख्यमंत्री म्हणाले. २०१२ साली बाळासाहेब आपल्यातून गेले आणि त्यानंतर २०१४ साली आपण एकटे लढलो. तेव्हाही आपण हिंदूच होतो. त्यावेळी ६३ आमदार निवडून आले होते. मधल्या काळात जे काही मिळालं ते शिवसेनेमुळे मिळालं हे लक्षात ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना आणि हिंदुत्व कदापी एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाऊन आलेत. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत, विधीमंडळात बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
माझी जी शस्त्रक्रीया झाली होती त्यानंतरचे दोन, तीन महिने फार विचित्र होते. तो काळ फार विचित्र होते. त्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केलेली आहे. मी भेटत नव्हतो तर काम होतं नव्हती असं नाही. मी पहिली कॅबिनेट मिटींग अशीच ऑनलाइन केली होती, याकडेही उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले.