कोथरुड

कोथरूडमधील काही भागात अघोषित लोड शेडिंग ; वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा..अल्पना वरपे यांचा महावितरणला इशारा

कोथरूड: कोथरूड मधील डावी- उजवी भुसारी कॉलनी, एकलव्य कॉलेज परिसर, गादीया इस्टेट – शास्त्रीनगर तसेच सागर कॉलनी- डी पी रोड परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा  लागत आहे. सततच्या वीज पुरवठा खंडित प्रकारामुळे खेडे गावा पेक्षा वाईट परिस्थिती कोथरूड मधील वरील भागातील नागरिक अनुभवत आहेत. त्यामुळे तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी केली आहे.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

सदर मागणीचे निवेदन मा.नगरसेविका सौ.अल्पना गणेश वरपे यांनी मुख्यअभियंता महावितरण पुणे परिमंडल मा.सुनील काकडे यांना आमदार भिमरावआण्णा तापकीर यांच्या उपस्थितीत दिले.या वेळी अॅड.गणेश वरपे,वैभव मुरकुटे,सुरेंद्र कंधारे आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20250523 wa01261463383968059538304

अल्पना वरपे यांनी सांगितले की, डावी- उजवी भुसारी कॉलनी, एकलव्य कॉलेज परिसर, गादीया इस्टेट – शास्त्रीनगर तसेच सागर कॉलनी- डी पी रोड परिसरातील रहिवाशांना रोजच 3-6 तासापर्यंतच्या अघोषित लोड शेडिंगचा सामना करावा लागत आहे. या अघोषित लोड शेडिंगमुळे नागरिकांना पाणी प्रश्नापासून इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नियमीत वीज पुरवठा होत नसल्याने मेडिकल संदर्भातील समस्यांना ही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. घरात कोणी ऑक्सिजन चा रुग्ण असेल तर त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. वर्क फ्रॉम होम असलेल्यांच्या नोकरीवर देखील याचा परिणाम झालेला आहे.

ज्या पद्धतीने एखा‌द्या व्यक्तीने वीजबिल वेळेवर भरले नाही तर तत्परतेने त्याच्यावर कारवाई होते. परंतु दैनंदिन जीवनात वीज ही मूलभूत गरज झालेली असून देखील तेवढ्या तत्परतेने वीजे संबंधितल्या तक्रारींचे निवारण होताना दिसत नाही, तसेच  महावितरणच्या कोथरुडच्या कॉल सेंटर व संबंधित अधिकाऱ्यांकडून नागरिकांना अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप वरपे यांनी केला आहे.

वरील भागातील ट्रान्सफॉर्मर, RMU युनिट्स, भूमिगत व ओवरहेड केबल्स, फिडर पिलर्स अश्या सारख्या वीज पुरवठ्याकरीता महत्वाच्या असणाऱ्या साधनांची दुरुस्ती व मेंटेनन्स वेळोवेळी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे, ही अतिशय गंभीर बाब असून महावितरण कर्मचाऱ्यांच्या अशा हलगर्जीपणा मुळेच नागरिकांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

वर उल्लेख केलेल्या भागातच ही अघोषित लोड शेडिंग होत असून इतर भागात मात्र सुरळीत वीज पुरवठा चालू असतो. त्यामुळे सदर अघोषित लोड शेंडीग हे आपल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे म्हणजे मानवनिर्मित आहे त्यामुळे सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता या भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरण कार्यालयात निषेधाचा पहिला टप्पा म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा वरपे यांनी दिला आहे.

उपकार्यकारी अभियंता उमेश सासणे यांनी हे निवेदन  घेतल्यानंतर याबाबत तातडीने सदर भागातील उप अभियंत्यांची बैठक घेऊन दुरूस्तीच्या व मेंटेनन्स संदर्भातील उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.

Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये