क्या यही हैं अच्छे दिन ? महागाईचे फलक लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुण्यात अनोखे आंदोलन

पुणे:क्या यही हैं अच्छे दिन ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने अनोख्या पद्धतीने आंदोलन करून केला आहे. वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काल सोमवारी शहराच्या विविध भागात महागाई दर्शवणारे फलक लावण्यात आले, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी दिली.
या फलकांवर 2015 वर्षी असणारे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस चे दर आणि 2021 मधील दर यातील तफावत दर्शवली आहे. शहरात कोथरूड, नळस्टॉप, डेक्कन, शिवाजीनगर, सेनापती बापट रोड, चांदणी चौक, बावधन, चतुशृंगी येथील पेट्रोल पंपावर हे फलक लावण्यात आले.
गिरीश गुरनानी म्हणाले, ‘अच्छे दिन’ आणणार असल्याच्या भुलथापा देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ करून गोर-गरीब जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करीत आहे.2015 ते 2021 या काळात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस च्या किमतीचा दर वाढत गेला. तो वाढतोच आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे.

सरकारने त्वरित देशातील इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी गिरीश गुरनानी यांनी केली. गुरनानी पुढे म्हणाले, ‘कोविड काळामध्ये जनतेला धीर देण्याऐवजी ‘अच्छे दिन’च्या नावाखाली इंधन दरवाढ करून मोदी सरकार जनतेची लुबाडणूक करत आहे.



