चतुःश्रृंगी टेकडी परिसरात वनविहार प्रकल्प

जिल्हा नियोजन मंडळाची तत्त्वतः मंजूरी
पुणे : चतुःश्रृंगी ते सिंबायोसिस येथील टेकड्यांवर पाचगांव वनविहारच्या धर्तीवर प्रकल्प राबवावा अशा प्रस्तावास पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत तत्त्वतः मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.(Vanvihar project in Chatushringi hill area)
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज (मंगळवारी).पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत बोलताना शिरोळे यांनी वनविहाराची संकल्पना मांडली. चतुःश्रृंगी ते सिंबायोसिस व फर्ग्युसन कॉलेज या परिसरातील टेकड्यांवर रोज सकाळी अनेक अबालवृद्ध फिरण्यासाठी येतात. या टेकड्यांवर पर्यावरण राखले जावे तसेच तिथे एक छोटेसे पर्यटन केंद्रही व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. पाचगांव येथील वनविहारच्या धर्तीवर या टेकड्यांचा विकास व्हावा आणि त्यासाठी निधी मिळावा असा प्रस्ताव शिरोळे यांनी बैठकीत मांडला. वन राज्य मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी तत्त्वतः या प्रकल्पाला मंजूरी दिली असून लवकरच त्या करीता निधी मंजूर करण्यात येईल असे आमदार शिरोळे यांनी सांगितले. शहरातील अन्य टेकड्यांवरही पर्यावरण राखणारे प्रकल्प व्हावेत असेही शिरोळे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

शहरामध्ये शासकीय व्यसनमुक्ती केंद्र असावे अशी सूचनाही आमदार शिरोळे यांनी केली. व्यसनातून बाहेर पडण्यासाठी अनेकांचे प्रयत्न चालू असतात. परंतु खाजगी केंद्रात उपचार महाग असतात त्यामुळे शासकीय केंद्रांची गरज असल्याचे ते म्हणाले. तसे पत्र पण शिरोळे यांनी पालक मंत्र्यांना मागील महिन्यात दिले होते.
तीन चाकी आणि हलक्या वाहनांची योग्यता तपासणीसाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातच रोलक ब्रेक टेस्टिंग सिस्टीम असावी अशीही मागणी शिरोळे यांनी केली. रिक्षा चालक तसेच अन्य वाहनांच्या चालकांना टेस्टिंगसाठी दिवे घाटात जावे लागते. यात वाहनचालकांचा वेळ जातो तसेच इंधनावर खर्च होतो असे त्यांनी सांगितले. टेस्टिंगसाठी २०१८ साली माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या निधी मधून ५०लाख आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या निधी मधून 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली. आज च्या बैठकी मध्ये या कामाचा आढावा घेण्यात आला आणि पुढील ३ महिन्यात काम पूर्ण होईल असे जिल्ला प्रशासनाने सांगितले आहे.






