“…तर उर्वरित पन्नास टक्के आरक्षण कोणासाठी शिल्लक राहणार?”, छगन भुजबळ यांचा सवाल

नागपूर : मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ते आरक्षण ओबीसीमधून देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे मांडली आहे. मराठ्यांसह सर्व मागासलेल्या समाजाला आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेत सामावून घेतले तर उर्वरित पन्नास टक्के कोणासाठी शिल्लक राहणार आहे याचाही विचार सरकारने करावा, असे मतही भुजबळ यांनी मांडले आहे.
आरक्षणावरील मर्यादा उठवावी
ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणामध्ये आधीच खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे ओबीसी समाजासाठी फक्त १७ टक्केच आरक्षण शिल्लक आहे. अशात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास ओबीसी जाणार कुठे? मराठा नेत्यांनाही इतर समाजातील वाट्यातून आरक्षण नको आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून एकूण आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवावी व मराठा समाजाला ५० च्या वर अतिरिक्त दहा टक्के आरक्षण द्यावे, असेही भुजबळ म्हणाले.
अजित पवार बोलले त्यात गैर काय
अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. राजकारणात कोणालाही आपली प्रगती व्हावी असेच वाटणार. त्यामुळे अजित पवार तसे बोलले असतील तर त्यात गैर काय, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.




