आम्ही व्यापारी ग्राहकांनाही मतदानासाठी आवाहन करणार- सुनील गहलोत
पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबा
पुणे : पुणे शहर राजस्थानी समाजाने भारतीय जनता पक्षाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त समस्त राजस्थानी समाज पुणे शहराच्या वतीने बाणेर मध्ये दिवाळी सस्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने एकमताने भाजपा आणि कोथरुड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
यावेळी अध्यक्ष सुनिल गहलोत, महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित उमेश चौधरी, रामलाल चौधरी, चंदुलालजी भायल, जयप्रकाश पुरोहित, दिनेश चौधरी (सिवासी), लक्ष्मणराव परिहार, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, प्रकाश तात्या बालवडकर, लहुजी बालवडकर यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी आणि राजस्थानी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजस्थानी समाज संघटनेचे अध्यक्ष सुनील गहलोत म्हणाले की, राजस्थानी समाज भाजपा वर प्रेम करणारा आहे. आम्ही व्यापारी आहोत, त्यामुळे आम्ही तर मतदान करणारच आहोत, पण आम्ही आमच्या ग्राहकांनाही भाजपा आणि कोथरूडचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनाच मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत, अशी ग्वाही दिली.
समाजाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्वातंत्र्य काळापासून राजस्थानी बांधवांचं भाजपावर प्रेम राहिलेलं आहे. भैरवसिंह शेखावत हे तीनदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते उपराष्ट्रपती झाले. त्यानंतरही वसुंधरा राजेजी, राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री भजनलालजी शर्माजी यांच्या पाठिशी राजस्थानी समाज उभा राहिला आहे.
ते पुढे म्हणाले की, राजस्थानी समाज हा व्यापारी समाज आहे. व्यापाराच्या निमित्ताने तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जातो, तिथे आपलं स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करतो. माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावरही समाजाने भरभरून प्रेम केले आहे. समाजाच्या मागणीनुसार माननीय मोदीजींनी एलबीटीतून व्यापाऱ्यांची सुटका केली. त्यामुळे भविष्यात ही समाजाचे प्रेम भाजपावर कायम राहो, अशी भावना यावेळी व्यक्त केली.