येरवडा येथील मनोरुग्णालयाच्या विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रयत्न करणार – खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे : येरवडा मनोविकृती प्रादेशिक मनोरुग्णालयास भेट देत खासदार मेधा कुलकर्णी यांनी परिस्थितीची पाहणी करत डॉक्टर व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी येथील अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
या प्रसंगी कुलकर्णी यांनी येरवडा मनोविकृती प्रादेशिक मनोरुग्णालयात असणाऱ्या रुग्णसेवा प्रणालीची माहिती घेतली व तेथील डॉक्टर, कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर चर्चा केली.
मनोरुग्णालयातील अतिशय जुन्या इमारती, नूतन अद्ययावत इमारतींची आवश्यकता, पाणी आणि ड्रेनेज व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता, आधुनिक आणि उपयुक्त व्यावसायिक शिक्षणाची गरज, वर्षानुवर्षे येथेच राहणार्या रुग्णांचा विचार, कुटुंबाची जबाबदारी झटकण्याची मानसिकता, लांबून येणार्या रुग्णांसाठी पुरेशी दीर्घ मुदतीची औषधे देण्याची क्षमता, त्यासाठी अधिक निधीची तरतूद या आणि अश्या अनेक मुद्यांवर चर्चा कुलकर्णी यांची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली.

या सर्व विषयात स्वतः लक्ष घालून अडचणी सोडविण्याचे आश्वासन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक सुनिल पाटील, सहाय्यक संचालक प्रशांत वाडीकर, भाऊसाहेब माने, उपअधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड, भुलरोग तज्ञ डॉ.पल्लवी तारळकर, वरिष्ठ मनोविकृती तज्ञ, डॉ. संदीप महामुनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.









