महिलांची सांधेदुखी ; लक्षणे, उपाय व तंत्रज्ञान : डाॅ.सचिन नागापूरकर

आज महिला ह्या एकविसाव्या शतकात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एक स्त्री.. महिला… बहुआयामी व्यक्तिमत म्हणून समाजात वावरते.. ती कोणाची आई तर कोणाची बायको, कोणाची मुलगी तर कोणाची सून.. ह्या बहुआयामीपणा मुळे नक्कीच तिचे कौतुक होते.पण आजही शहरी भागातील असो अथवा ग्रामीण भागातील महिला असो..आरोग्याबाबतची काळजी करताना महिला दिसत नाहीत. Women’s joint pain; Symptoms, Remedies and Technology
स्त्री जीवनात माझ्या मते तीन मह्त्वाचे टप्पे असतात..
शालेय जीवन(Premenstrual) , menstrual ( प्रसूती)आणि post menopausal ( रजोनिवृत्ती)
आणि ह्या तीन महत्त्वाच्या टप्प्यावर महिलांनी आपली स्वतःची आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आणि पुरूषांनी सुद्धा आपली बहिण, आई, आजी, मावशी,
काकू, आत्या, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
आज आपण महिलांची सांधेदुखी ह्या विषयावर माहीती घेऊयात.
साधारणपणे वयाच्या चाळीस नंतर येणारी सांधेदुखी महिलांमध्ये हल्लीच्या धकाधुकीच्या जीवनात लवकर बघायला मिळत आहे. ज्या आजारात वयोमानानुसार सांधे दुखतात, खराब होतात, सांध्यावर सूज येते, गुडघे कंबर मानपाठ दुखणे सुरू होते त्याला वैद्यकीय भाषेत सांधेदुखी म्हणतात.
पण कमी वयात सांधे दुखणे, खराब होणे, हातांची बोटे दुखणे, सूज येणे, वाकडी होणे, गुडघ्यांवर सूज येणे, पायांची बोटे सुजणे, वाकडी होणे ह्या आजाराला वैद्यकीय भाषेत संधिवात असे म्हणतात.
त्यामुळे आपला आजार हा संधीवात आहे की सांधेदुखी आहे हे आपण आधी योग्य त्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासूप घेतले पाहीजे. साधारणपणे संधीवातामध्ये एकापेक्षा जास्त सांधे खराब होतात, दुखतात, सूज येते.
आणि वयोमानानुसार येणारी जी सांधेदुखी असते ती बऱ्याच वेळा एखाद्या सांध्याला त्रास देणारी असते.

लक्षणे :
लक्षणांवरून आपण नक्कीच आजाराचे निदान करू शकतो की ही सांधेदुखी आहे की संधीवाताचा एक प्रकार आहे.
सतत सांधे दुखत राहणे, सांध्याची हालचाल मंदावणे, गुडघ्यांवर सूज येणे, दैनंदिन जीवनातील कामे मांडी घालणे , खाली जमिनीवर बसणे, पुढे वाकून काम करणे ,झाडून काढणे, जीनाचढउतार करताना त्रास होणे,
मानेचा भाग सतत दुखत राहणे, हाताला पायाला मुंग्या येणे.अशी बरीच लक्षणे दिसून येतात.
महिलांवरील सांधेदुखी ही तसे बघायला गेले तर वयोमानानुसार जरी येत असली तरी झालेल्या प्रसूती, मासिकपाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव, आहारात सकस गोष्टीचा अभाव ह्यामुळे हाडांचे महत्त्वाचे व्हिट्यामिन ड व कॅल्शियम यांची कमतरता व त्यामुळे लवकरात लवकर सुरू होणारी सांधेदुखी. बऱ्याच महिलांना रजोनिवृत्तीनंतर शरिरात होणाऱ्या बदलांमुळे सांधेदुखी सुरू होते.
हाडे ठिसूळ होणे, हाडे कमकुवत होणारा आजार मुख्यत्वेकरून रजोनिवृत्ती नंतर दिसून येतो आणि ह्याच कारणांमुळेच महिलांमध्ये सांधेदुखी सुरू होते.
निदान/ उपाय :
महिलांमधील सांधेदुखी/ संधीवात ह्याचे निदान लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. ज्यायोगे लवकर निदान व लवकर उपचार सुरू करता येतात.
सांधेदुखीच्या रुग्णाची संपूर्ण शारिरीक तपासणी अत्यंत आवश्यक आहे. जसे की रक्तातील साखर, व्हिट्यामिन ड व कॅल्शियमची तपासणी, रक्तदाब तपासणी, थाॅयराॅइड ची तपासणी, स्तानाची, गर्भाशयाची तपासणी ज्या योगे कर्करोगाबद्दलची पण तपासणी होते. हाडे किती ठिसुळ झाली आहेत ह्याची बीएमडी तपासणी आज आपल्याला करता येते. गरजेनुसार एक्सरे, एम.आर.आय. , सिटीस्कॅन ची तपासणी. उपायांचा जर विचार केला तर लवकर निदान करणे आवश्यक आहे. आज वैद्यकीय विषयातील प्रगतीमुळे ह्या सांधेदुखी वर सहज व अचूक उपचार उपलब्ध आहेत, औषधे आहेत.
गरजेनुसार सांधेदुखी कमी करण्यासाठी विविध प्रकारची इंजेक्शन उपलब्ध आहेत. जसे की गुडघ्यांतील वंगन अथवा ऑईल चे इंजेक्शन, मनक्यातील नसांवरील दाब सूज कमी करण्यासाठीचे मनक्यात देण्यात येणारे इंजेक्शन, हाडे जर लवकर व जास्त ठिसूळ झाले असतील तर ते मजबूत करण्यासाठीची इंजेक्शन पण आज उपलब्ध आहेत. ज्यामुळे हाडे कमजोर होत नाहीत व परिमाणतः सांधेदुखी कमी होते….
तंत्रज्ञान
आज वैद्यकीय विषयातील नवनवीन संशोधन व तंत्रज्ञानामुळे आज ह्या सांधेदुखीवर अचूक उपचार करणे सोपे झाले आहे. ह्या नवनवीन औषधांमुळे आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळते आहे. हाडे मजबूत करण्यासाठीची औषधे, इंजेक्शन आज उपचाराचा एक खूप महत्त्वाचा भाग झाली आहेत. योग्य तो व्यायाम, सकस आहार ह्या बाबतपण महिलांनी काळजी घेतली तर नक्कीच त्यांची सांधेदुखी कमी होऊ शकते.
गरजेनुसार आज ज्या महिलांना सांधेदुखीवर फक्त औषधांनी उपाय होत नाही. उदाहरणार्थ गुडघेदुखीचा त्रास मग अश्या महिलांवर गुडघेदुखीच्या आजारावर उपचार म्हणून बर्याच वेळा कृत्रिम सांधावरोपण शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. कृत्रिम सांधावरोपण शस्त्रक्रिया ह्या विषयात पण आज नवनवीन तंत्रज्ञानामुळे ही कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया आजच्या काळातील एक गुडघे दुखी च्या आजारावर मात करण्यासाठी वरदानच ठरलेली आहे.
आज कृत्रिम सांधावरोपण शस्त्रक्रिया चा विचार केला तर चार महिला मागे एक पुरूष यांना ही शस्त्रक्रिया करावी लागत आहे. खूप उपयुक्त आणि सांधेदुखीवर वरदान ठरणारी ही शस्त्रक्रिया आहे. काँप्युटर तंत्रज्ञानाचा वापर करून आज ही शस्त्रक्रिया करता येते..
चला तर मग महिलांवरील सांधेदुखी…संधिवातावर मात करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत…
सकस आहार, योग्य तो व्यायाम, नियमित वैद्यकीय तपासणी, आजार अंगावर काढणे बंद, लवकर निदान व लवकर उपचार आणि गरजेनुसार अस्थीरोग विषयातील तंत्रज्ञानाचा उपयोग करून सांधेदुखी कमी करूयात.
डाॅ.सचिन नागापूरकर
अस्थीरोग व कृत्रिम सांधेरोपण तज्ञ पुणे



