नीलम गोऱ्हेंच्या पदावर ठाकरे गटाचा, शेकाप आमदार जयंत पाटील यांचा आक्षेप

मुंबई : विधान परिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच संपलं. नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला. सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे असं ते म्हणाले. जे सभागृह आपण चालवत असताना ज्या या पदावर बसल्या त्यावेळी त्यांचा पक्ष नसतो असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदावर ठाकरे गटानं तीव्र आक्षेप घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली.
विधानपरिषदेत विरोधी बाकांवरून नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदी राहण्यावरच आक्षेप घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मात्र, त्यावर नंतर बोलण्यास दिलं जाईल, असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी चर्चेची परवानगी नाकारली. “अशा प्रकारे सभागृहाला वेठीस धरता येणार नाही”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की असं कधीही कुठल्याही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही. त्याचे काही नियम आहेत. नियमांमध्ये बसत असेल तरच आक्षेप घेता येतो. त्यामुळे हा आक्षेप घेता येणार नाही. सभापतींना माझी विनंती आहे की आज शोक प्रस्तावासारखा महत्त्वाचा प्रस्ताव आहे अशावेळी नियमबाह्य कामकाज करता येणार नाही. त्यामुळे सन्मानिय सदस्य जो आक्षेप घेत आहेत तो नोटीस न देता सदस्यांना घेता येणार नाही अशी पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हेंवर घेतलेला आक्षेप खोडून काढला. यानंतर नीलम गोऱ्हे स्वतःच बोलायला उभ्या राहिल्या.



मी विधान परिषद सदस्य.जयंत पाटील यांना बोलण्याची संमती दिली. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. पण मला एक बाब सांगायची आहे. तुम्हाला गोंगाट करायचा आहे, हुर्यो करायचा आहे तर आधी मी सांगू इच्छिते की शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण दुसरा कुठलाही प्रस्ताव घेत नाही. आज माझी तुम्हाला विनंती आहे की आपण गटनेत्यांच्या मिटिंगला असतात तर मी वेळ निर्धारित केली असती. पण तुम्ही आला नव्हता, विरोधी पक्षनेते, गटनेते कुणीही आलं नाही. तुम्हाला माझ्यावर आक्षेप घेण्यासाठी वेळ दिली असते. उद्या त्याला संमती कधी द्यायची आपण पाहू. असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. यानंतर अध्यादेश वाचण्याचे निर्देश त्यांनी दिले.



यानंतर शोकप्रस्ताव मांडून सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. “विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे काम बघत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत:हून पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. दहाव्या परिशिष्टातील कायद्याच्या २ अ मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. त्याअंतर्गत आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे”, असं अनिल परब यावेळी म्हणाले.



“सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा निर्णय काय झालाय हे सगळ्यांना माहिती आहे. न्यायालयाने ही सगळी प्रकरणं अध्यक्षांकडे पाठवली आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत सभापती नाहीयेत. उपसभापतींवरच अविश्वासाचा ठराव आहे. म्हणून आम्ही त्यांना पदावरून हटवण्याचीही नोटीस दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नबाम राबिया प्रकरणातील दाखला देत स्पष्ट केलं गेलंय की ज्यावेळी सभापती-उपसभापती पदावर अविश्वास दाखवला जातो, त्यावेळी त्या सदस्याला खुर्चीवर बसण्याचा कायदेशीर वा नैतिक अधिकार नाही. जोपर्यंत अपात्रता याचिकेचा निर्णय लागत नाही, पदावरून दूर करण्याच्या नोटीसबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत या सभापतींनी त्या खुर्चीवर बसू नये अशी आम्ही भूमिका घेतली. आमची भूमिका न मांडू दिल्यामुळे आम्ही सभात्याग केला”, असं अनिल परब म्हणाले.
“हे सरकार संख्याबळावर माजलंय. उपसभापती त्यांना पूर्णपणे मदत करत आहेत. आज बहिष्काराचा निर्णय झालाय. आता मविआच्या बैठकीत पुढची दिशा ठरवली जाईल”, असंही अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केलं.



