मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी वारजे माळवाडी सकल मराठा समाजाचा मशाल मोर्चा

वारजे : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला आणि त्यासाठी गावोगाव सुरू असलेल्या साखळी उपोषणांना पाठिंबा देण्यासाठी वारजे माळवाडी व न्यू अहिरे गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला मुदत देली आहे. परंतु हा लढा थांबलेला नसून त्यांच्या सांगण्यानुसार गावोगावी साखळी उपोषणे सुरू आहेत. या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी वारजे माळवाडी व न्यू अहिरे गावातील सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला.
एनडीए रस्त्यावरील गणपती माथा वारजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वारजे जकात नाका या दरम्यान काढण्यात आलेल्या मशाल मोर्चामध्ये ग्रामस्थ मंडळी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिलावर्ग, लहान मुले, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचं हक्काचं, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.







