23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश ; पुणे महापालिका राज्यात सर्वात मोठी महापालिका ….

पुणे : मुंबईत काल उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्यातील प्रशासकीय अधिकारी आणि पुण्यातील काही आमदार यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यालगत असणाऱ्या तेवीस गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्यात यावा यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयानंतर पुणे महापालिका की राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारे महापालिका ठरणार आहे.(23 villages included in Pune Municipal Corporation; Pune Municipal Corporation is the largest municipal corporation in the state.)
पुणे महापालिकेमध्ये 23 गावांचा समावेश झाल्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे. तेवीस गावांच्या समावेशामुळे पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ हे 485 चौरस किलोमीटर इतके होणार आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मुंबई सर्वात मोठी महापालिका राहणार असली तरी आकाराने पुणे महापालिका सर्वात मोठी होणार आहे. या गावांच्या समावेशामळे पुण्याची हद्द चारही बाजूंनी वाढणार आहे. त्याचबरोबर पुण्याच्या लोकसंख्येतही दहा ते बारा लाखांची भर पडणार आहे.

पुणे महानगरपालिकेचा दरवर्षीच बजेट अंदाजे आठ हजार कोटीच्या घरात असतं. इतकं प्रचंड बजेट असूनदेखील शहरातील मूलभूत सुविधा देखील पूर्ण होत नाहीत.रस्त्यासाठी, पाण्यासाठी येथील नागरिकांना दरवर्षी झगडावं लागतं. त्यात या तेवीस गावांचा नव्याने पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्याने या नागरिकांना देखील मूलभूत सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. तीन वर्षांपूर्वी 11 गावांचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला होता.. तेथील नागरिकांना आतापर्यंत मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाही, असे असताना या तेवीस गावातील नागरिकांचा विचार महापालिका प्रशासन खरंच करेल काय असा प्रश्न येथील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
महानगरपालिकेत समावेश झाल्यास आनंदच आहे अशी भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. परंतु महानगरपालिकेत गेल्यानंतर आम्हाला अधिकचा कर द्यावा लागेल. घरपट्टी, पाणीपट्टी भरावी लागेल.. त्या प्रमाणात आम्हाला इतर सुविधा मिळतील काय असा प्रश्नही या ग्रामस्थांनी उपस्थित केला.
पुणे मनपा हददीत २३ गावांचा समावेश करणेच्या निर्णयाचे स्वागत : दिपाली धुमाळ (विरोधी पक्षनेत्या पुणे महानगरपालिका)
उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने पुणे महानगरपालिका हददीत २३ गावांचा समावेश करणेबाबत शासनाने निर्णय केला असून याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही आता चालू होणार आहे. हा निर्णय नक्कीच अभिनंदनीय असून समाविष्ट २३ गावातील विकासकामांचा मार्ग मोकळा झालेला आहे. याठिकाणी नियोजनबध्द विकास होणे शक्य होणार आहे. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचावणार असून शहरीकरणाचा वेग वाढणार आहे. पुणे शहर हे आता ख-या अर्थाने देशातील सर्वात मोठे शहर झाले आहे. या निर्णयासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांचे व महाविकास आघाडी सरकारचे जाहिर आभार !



