वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे-बेंगळुरू बायपास रस्त्याला ३०० कोटी रुपये – चंद्रकांत पाटील यांची माहिती
पुणे : पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी सूचविलेल्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दर्शविला असून तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्वत: मान्यता दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुणे-बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी हा सध्याचा गंभीर विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांनी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महापालिकेचे वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, आर्किटेक्ट ( मेटा आर्च) मिलिंद रोडे यांच्यासह इतर सहकाऱ्यांसमवेत आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तयार केला.
अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर शनिवारी या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. गडकरी यांनी या सादरीकरणाचे कौतुक करत तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलिसांना एकत्र बैठक घेण्यास सांगितले. त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत करावयाच्या उपाययोजनांबाबत दोन्ही यंत्रणांनी कृती आराखडा तयार केला असून त्याला श्री. गडकरी यांनी ३०० कोटी रुपयांच्या खर्चास तत्वत: मान्यता दिल्याचे श्री. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वेळोवेळी बैठका घेऊन; वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पुणे पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करुन; केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या समोर सादरीकरण केले.
प्रस्तावित विकास कामे
– पुणे महापालिकेच्या माध्यमातून भूमकर अंडरपास शेजारी प्री-कास्ट बॉक्स पद्धतीचा जोड अंडरपास करणे.
– ननावरे अंडर पासजवळ किया शोरुम येथे आणि रिनॉल्ट शोरुम येथे प्रत्येकी एक असे दोन अंडरपास तयार करणे.
– नवले ब्रीज येथे नऱ्हेच्या दिशने जाणाऱ्या वाहनांसाठी एका लेनवर कॉन्टिलिव्हर ब्रीज बांधून इतर सर्व लेनला चॅनेलाईज करून चौक सिग्नल फ्री करणे.
– पाषाण-सूस रोडवरुन हायवेला जोडणारा जोड रस्ता व प्रलंबित सर्व्हिस रोड पूर्ण करणे.
– राधा हॉटेल येथील पीएमपीएमएलची जागा व हॉटेल ऑर्किड समोरिल जागेवर १०० मीटर मार्जिन रस्ता तयार करुन रोटरी वाहतूक सुरू करणे. तसेच, याठिकाणी अंडरबायपास तयार करण्यासाठी व्यवहार्यता तपासणी करणे.
– पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोड पैकी २७.९९ किमी लांबीचे व १२ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड तयार करणे.
– पुणे महापालिकेकडून ४९.१२ लांबीचा व १२ किमी रुंदीचा बाह्य सेवा रस्ता तयार करणे.
– पुणे महापालिकेच्या माध्यमातून बाणेर रस्त्याला बालेवाडी-औंध रस्ता सक्षम पर्याय असल्याने बालेवाडी स्टेडियम समोर बालेवाडी कडून मुंबईला जोडण्यासाठी उड्डाणपूल उभारणे आदी उपाय सुचविण्यात आले.
पुणे-बेंगळुरू बायपासची वस्तुस्थिती
– गेल्या पाच वर्षात सुमारे २० लाख वाहनांची वाढ.
– पुण्यात २०१८ मध्ये पुण्याची वाहनसंख्या ५२ लाख होती, ती २०२४ मध्ये ७२ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
– दररोज १३०० नवीन वाहनांची भर पडते, त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.
– पुण्याला नसणारे रिंग रोड नसल्याने पुणे-बेंगळुरू रस्त्याचा वापर रिंग रोड म्हणून करण्यात येतो.
– पुणे-बेंगळुरू रस्ता सध्या जरी बायपास म्हणून असला तरी तो सोलापूर, सासवड, सातारा, मुंबईकडून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता रिंग रोड म्हणून वापरला जातो.
– या बासपायची निर्मीती १९९४ मध्ये दोन लेनचा हायवे म्हणून करण्यात आली होती.
– हा बायपास २००० मध्ये दोन लेनचा रस्ता वाढवून चार लेनचा करण्यात आला.
– तसेच २०१० मध्ये सहा लेनचा रस्ता प्रस्तावीत झाला असून या सहा लेनची कामे अजून ही काही ठिकाणी प्रगती पथावर आहे.
– गेल्या तीस वर्षात नऱ्हे, धायरी, नांदेड सिटी, उत्तमनगर, भूगाव, पिरंगुट, सूस, बाणेर, म्हाळुंगे, हिंजवडी, आणि किवळे या भागांमध्ये साधारणतः १० लाखांपेक्षा जास्त नागरीक वास्तव्यास आहेत.
– त्याचप्रमाणे या दक्षिण भागामध्ये आयटी पार्क विशेषतः हिंजवडीसह अनेक औद्योगिक व शैक्षणिक संस्था झालेल्या आहेत.
– दररोज साधारण २ ते ३ लाख नागरिक हायवेचा वापर करतात. तर, पिक हवर्सला १५ ते २५ हजार लोक या रस्त्याचा वापर करतात.
– या रस्त्यावर गेल्या तीन वर्षात १०० पेक्षा अधिक अपघात झालेले असुन त्यामध्ये ६८ लोकांनी जीव गमावलेला आहे व ५४ लोक गंभीर जखमी झालेले आहेत.
………..
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बेंगळुरू रस्त्यावरील उपाययोजनांना तत्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी एनएचआय, पुणे महापालिका तसेच पुणे पोलिसांनी एकत्रिकपणे या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. या उपाययोजनांनंतर या बासपासवरील वाहतूक कोंडी फुटण्यास भरीव मदत होणार आहे.
चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री.
……….