शालेय अभ्यासक्रमातून धार्मिक शिक्षण नाही : वर्षा गायकवाड

मुंबई : मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी मांडली आहे. शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची भाजपची मागणी त्यांनी फेटाळून लावली. केवळ धर्माचे राजकारण करण्यासाठी भाजपकडून अशी मागणी केली जात असल्याचे सांगितले.
राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता समावेश करण्याची मागणी भाजपने राज्य सरकारकडे केली आहे. मात्र ही मागणी मान्य करता येणार नाही, असे वर्षां गायकवाड यांनी स्पष्ट केले. भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. एका धर्माच्या ग्रंथाचा शिक्षणात समावेश केला तर, इतर धर्मीयांकडूनही तशी मागणी होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष तत्वाचा समावेश आहे. विद्यार्थीदशेपासून मुलांच्या मनात हे विचार रुजविले पाहिजेत. त्याचबरोबर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे राजीव गांधी विज्ञान नगरी ( राजीव गांधी सायन्स सिटी) स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही धर्माचे शिक्षण विद्यार्थ्यांना देता येणार नाही. धर्मग्रंथांचे पठन घरात करावे, शालेय शिक्षणात त्यांचा समावेश करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.




