
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात करोना काळातील भ्रष्टाचाराची कुंडली मांडत सरकारची कोंडी केली. कोव्हिड सेंटर्समधील भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर तपशीलवार भाष्य करताना त्यांनी मुंबईतील कोव्हिड सेंटर्सची कंत्राटे आरोग्य क्षेत्रातील नामांकित संस्थांना न देता राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांना देण्यात आल्याचा आरोप केला. प्रेतावरच्या टाळुवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांकडून आपलं घर भरणं सुरूच आहे, अशी जळजळीत टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
लाईफलाईन मॅनेजमेंट हॉस्पिटस सर्व्हिसेस या कंपनीला पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचे कंत्राट मिळाले होते. मात्र, १५ दिवसांत त्यांची हकालपट्टी झाली. त्यानंतर याच कंपनीला मुंबईतील पाच कोव्हिड सेंटर्सची कंत्राटे देण्यात आली. मुलुंड कोव्हिड सेंटरचे कंत्राटही असेच तडकाफडकी देण्यात आले. कंत्राट मिळवताना आशा कॅन्सर ट्रस्ट अँण्ड रिसर्च सेंटरचे लेटरपॅड सादर करण्यात आले. मात्र, या संस्थेची माहिती घेतली तेव्हा प्रत्यक्षात अशी कोणतीही संस्था नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच या संस्थेने जो जीएसटी क्रमांक दिला होता तोदेखील एका डिपार्टमेंटल स्टोअरचा होता. ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांबाबतही असाच गोंधळ पाहायला मिळाला. यापैकी तीन कंपन्या काळ्या यादीत होत्या. करोना काळात इतके भयानक घोटाळे झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मध्यंतरी प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असे वक्तव्य केले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. आमचे मुख्यमंत्री साहेब म्हणतात प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. आम्ही उगाच इतकी वर्षे 22 ते 25 वर्षे तारांकित आणि अतारांकित प्रश्न विचारत बसलो. आम्हाला हे आधीच माहिती असतं तर आम्ही प्रश्न विचारत बसलो नसतो. आमची ही चूकच झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. अनेक कोव्हिड सेंटर्समध्ये एकही रुग्ण आला नसला तरी संबंधित कंपन्यांना 50 टक्के पैसे देण्यात आले.कंपन्यांना अशाप्रकारचा कामाचा कोणताही अनुभव नव्हता, तरी कोविड सेंटरची कंत्राटे देण्यात आली याकडे त्यांनी लक्ष वेधले.




