गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आक्रमकपणे आंदोलन करत चप्पलफेक करणाऱ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी एसटी आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्यायालयात सरकारी वकिलांसह सदावर्ते यांचे वकील तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. यावेळी सरकारची बाजू मांडणारे वकील प्रदीप घरत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल झालेले कलम गंभीर असून त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. तर सदावर्तेंनीच कामगारांना शरद पवारांच्या घराबाहेर आक्रमकपणे आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले असा आरोपही केला. तर त्याला प्रत्युत्तर देताना सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी सादर केलेल्या एफआयआरमध्ये अनेक गोष्टी बदलून लिहिल्याचा आरोप केला आहे, तसंच सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीसही देण्यात आली नाही, असा दावा केला.



