बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त; पिकांनी माना टाकल्या

बीड : मागील 17 दिवसापासून जिल्ह्यात पाऊस नसल्याने सोयाबीन आणि कापसाच्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची मोठी तूट आहे. जमिनीतही नावालाही ओलावा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त असून शेतकऱ्याच्या हातात काही येईल की नाही या चिंतेने त्याची झोप उडाली आहे.

परळी तालुक्यात ठिकठिकाणी सोयाबीन आणि कापसाला सध्या फुल आलेली असतानाच पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. यामुळे उत्पन्न घटणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात पाऊस न झाल्यास हे पीक हातातून जाणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. सोयाबीन लागवडीसाठी व्याजाने पैसे काढून एकरी 18 ते 20 हजार रुपये खर्च केल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. हा केलेला खर्चही वसूल होईल का नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली. शासनाने या सगळ्याची त्वरीत दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.



