ONLINE FRAUD : अनावश्यक अॅप डाऊनलोड करू नका; महिलेची 59 हजारांची फसवणूक

अकोला : ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिक अनावश्यक मॅसेजला आणि कॉलला उत्तर देऊन बळी पडत आहेत. अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत रहिवासी असलेल्या पेंशनधारक महिलेला एक मॅसेज आला. तुमचे सीमकार्ड बंद होणार आहे, तुम्ही हे अॅप डाऊनलोड करा, असं केल्यानंतर महिलेच्या खात्यातून लागलीच ५९ हजार रुपये परस्पर काढण्यात आले. रामदासपेठ पोलिसांत या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेजा मंगेश फडणीस (वय ६२ राहणार, भागवत प्लॉट, अकोला.) यांना ३० मार्च रोजी त्यांच्या मोबाइलवर सीमकार्ड ब्लॉक होईल, असा मॅसेज आला. तेव्हा मॅसेजमधील कस्टमर केअर नंबरवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पेटीएम, क्वीक सपोर्ट व बीएसएनएल, एनी डेस्क हे डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या एसीबीआयच्या पेंशन खात्यातून ५९ हजार रुपये काढून फसवणूक केली आहे. यानंतर त्यांनी बँक स्टेटमेंट तपासले असता त्यांच्या खात्यातून रक्कम काढल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी रामदासपेठ पोलिसांत तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.







