विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना महामेट्रोने विशेष सवलत योजनेत मासिक पास उपलब्ध करून द्यावेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस-अर्बन सेलची मागणी..
पुणे : शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पीएमपीएल बस सेवेप्रमाणे विशेष सवलत योजनेत मासिक मेट्रो पास उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस-अर्बन सेलच्या वतीने महामेट्रोकडे करण्यात आली आहे. Mahometro should provide monthly passes to students and senior citizens in a special discount scheme
या संदर्भातील निवेदन महामेट्रोचे जनरल मॅनेजर डॉ. हेमंत सोनवणे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस-अर्बन सेलच्या वतीने देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे समन्वयक स्वप्नील दुधाने, स्वप्निल खडके, प्रशांत गांधी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस-अर्बन सेलच्या अध्यक्षा, खासदार वंदना चव्हाण व शहर अध्यक्ष नितिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले आहे.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी PMPML बस सेवा माफक दरात मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देत असते. यामुळे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून PMPML बससेवेला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील कोथरूड वनाज ते डेक्कन या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन संपन्न झाले. पुणे शहरातील भुसारी कॉलनी कोथरूड मेट्रो स्टेशन ते गरवारे कॉलेज- डेक्कन या ५ कि.मी. अंतरात मेट्रो चालू झाली आहे. जून महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरू होत असून PMPML बससेवेच्या विशेष सवलत योजनेप्रमाणे मासिक मेट्रो पास उपलब्ध करून दिल्यास त्याचा लाभ विद्यार्थ्यांना व जेष्ठ नागरिकांना मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व जेष्ठ नागरिकांचे हित लक्षात घेता लवकरात लवकर या निवेदनावर कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस-अर्बन सेलच्या वतीने महामेट्रोकडे करण्यात आली आहे.




