नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे : शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभे असल्याचं सांगितलं.
पुण्यात वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ चं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, “साखर कारखानदारीसाठी राज्य सरकारची मदत हवीच असते. सुदैवाने आत्ताच्या राज्य सरकारमध्ये उसाबद्दल, कारखानदारीबद्दल जाण असणारे अनेक सहकारी आहेत. त्यामुळे त्यांचीही मदत होईल. आज केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील उसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते आणि त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे. ते आज या ठिकाणी आहे याचा मला मनापासून आनंद आहे.”

“सर्वांच्या प्रयत्नाने आपण साखर उद्योगात यश मिळवलं आहे. साखर उद्योगात महाराष्ट्र आता एक नंबर आहे. या क्षेत्रात प्रगती झाली याचा मला आनंद आहे, पण आता पुढील दिशा शोधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या अडचणीतून मार्ग काढणं गरजेचं आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.






