कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोथरूडमध्ये..महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा…

अमोल साबळे
कोथरूड : उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोथरूड मध्ये येत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांच्या कोथरूड भेटीला एक वेगळे महत्त्व असल्याचे मानले जात असून त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. युवा सेनेचे पुणे महानगर प्रमुख राजेश पळसकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उद्या रविवारी शिंदे कोथरूड मध्ये येत असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पुण्यात कार्यकर्त्यांना चांगली ताकद देत असल्याचे दिसत आहे.

कोथरुड भाग सुरवातीपासून भाजप सेना युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, परंतु सेने बरोबर भाजपची युती तुटल्यानंतर भाजपने कोथरूड मधील आपले वर्चस्व वाढवले. आता भाजप शिंदे सेनेची राज्य सरकारमध्ये युती आहे. येणारी महापालिका निवडणूक भाजप सेना युती म्हणून एकत्र लढणार का वेगळे लढणार यावर निर्णय झाला नसला तरी भाजप सेना युतीमध्येच ही निवडणूक लढतील अशी चर्चा आहे. युती मध्ये ही निवडणूक लढवली गेली तर कोथरूड मध्ये पुन्हा भाजप सेना युती म्हणून काय समीकरण घडतील हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
युतीमध्ये भाजप शिवसेनेने पुणे महापालिकेची निवडणूक लढवली तर कोथरूड मध्ये जास्त जागा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री प्रयत्न असणार आहे. युवा सेनेचे पुणे महानगर प्रमुख राजेश पळसकर हे पुण्यातील आक्रमक नेतृत्व आहे. जनतेच्या हक्कासाठी त्यांनी केलेली आंदोलने कायम चर्चेत राहिली आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोथरूड मध्ये येत आहेत. या कार्यक्रमाबरोबरच कोथरूड मधील राजकीय समीकरणे जुळवण्याची रणनीती एकनाथ शिंदे यांची असू शकते. कोथरूडमधील मातब्बर नेते आपल्या पक्षात आणता येतात का याचा प्रयत्नही ही शिंदे सेनेचा असू शकतो. या महापालिकेच्या निवडणुकीनंतर कोथरूड पुन्हा भाजप सेना युतीचा बालेकिल्ला म्हणून उदयाला येणार का हे पाहावे लागणार आहे.






