‘थोरामोठ्यांच्या सहवासातील विधानमंडळाचे ग्रंथपाल’ बा. बा. वाघमारे गौरव ग्रंथाचे प्रकाशन..

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळातील ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल बाळासाहेब बाबूराव उर्फ बा. बा. वाघमारे यांच्या ‘थोरामोठ्यांच्या सहवासातील विधानमंडळाचे ग्रंथपाल : बा. बा. वाघमारे’ या वि. दा. पिंगळे संपादित गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. बाळासाहेब वाघमारे, सौ. मनीषा बाळासाहेब वाघमारे, ओंकार बाळासाहेब वाघमारे आणि कुटुंबियांचे कौतुक करण्यासाठी आध्यात्मिक, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांची मांदियाळीच यशवंतराव चव्हाण केंद्रात उपस्थित होती.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे मंत्री बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महाराष्ट्र विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, हेमंत टकले, सुभाष चव्हाण, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, बाळासाहेब दांगट, दिलीपराव सोनवणे ,खंडेराव जगताप, दिनकर पाटील, वसंतराव बापू गायकवाड, हणमंतराव गायकवाड , बाळासाहेब जाधव प्रजापिता ईश्वरिय ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाचे महानुभाव अशा असंख्य मान्यवरांनी बाळासाहेब वाघमारे आणि सौ. मनीषा वाघमारे यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव केला.
बाळासाहेब वाघमारे यांनी आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र विधानमंडळाचे ग्रंथपाल म्हणून जे सर्वोत्कृष्ट कार्य केले, आपल्या गावी जे सामाजिक कार्याचे जाळे तयार केले त्याबद्दल मान्यवरांनी अभिनंदन करीत त्यांची पाठ थोपटलीच परंतु महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार देण्यात येतात त्यातच बा. बा. वाघमारे यांच्या नांवाने एक पुरस्कार देण्यात यावा, अशी अनेकांनी सूचना केली.
बाळासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला असल्याचे अनेक आजी माजी आमदार खासदार यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे तसेच बा. बा. वाघमारे गौरव ग्रंथाचे संपादक, मुद्रक, प्रकाशक आणि यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. निवेदिका शिबानी जोशी यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. गौरव ग्रंथ समितीचे अध्यक्ष एस. एस. लाखण यांनी उपस्थितांचे आभार मानले.




