उद्धव ठाकरेंना धक्का!शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंना मान्यता

मुंबई : विधीमंडळ सचिवालयाने एक परिपत्रक जारी करत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील इतर आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संबंधित आमदारांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेला व्हीप पाळलेला नाही. त्यामुळे या आमदारांना एकनाथ शिंदे यांनी नोटीस जारी केली, तर कायद्यानुसार आदित्य ठाकरेंसह उर्वरित १५ आमदार निलंबित होऊ शकतात.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर तातडीची कारवाई म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. त्यांच्याजागी विधीमंडळ गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण विधीमंडळ सचिवालयाने अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द केली आहे.
याशिवाय विधीमंडळ सचिवालयाने सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदावरील नियुक्ती देखील रद्द केली आहे. तसेच शिंदे गटाकडून भरत गोगावले यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी केलेली नियुक्ती योग्य ठरवली आहे.
उद्धव ठाकरेंसोबत असणारे आमदार
सुनील प्रभू, नितीन देशमुख, राहुल पाटील, संतोष बांगर, वैभव नाईक, सुनील राऊत, रवींद्र वाईकर, भास्कर जाधव, संजय पोतनीस, अजय चौधरी, दिलीप लांडे, प्रकाश फातेरपेकर, राजन साळवी, कैलास पाटील




