वीज बिलात सूट द्या अन्यथा आंदोलन करू : किरण दगडे पाटील

कोथरुड : महावितरण कंपनीकडून वाढीव वीज बिले देण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष आहे. आज या विरोधात नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांना भेटून निवेदन दिले असून वीज बीलात सुट द्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे रोजगार नसल्याने सर्वत्र आर्थिक संकट आहे अशातच वाढीव वीज बिले दिली जात असल्याने नागरिकांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात रीडिंग न घेताच अंदाजे वीज बिले दिली गेल्याने हा प्रकार घडला आहे. वीज बिलात तात्काळ सूट द्यावी. तसेच भविष्यात ही सूट कोणत्याही प्रकाराने वसूल करायचा प्रयत्न केला जाऊ नये आणि त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नये, अन्यथा असंख्य नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
किरण दगडे म्हणाले, सर्वसामान्य नागरिक आगोदरच आर्थिक संकटात असताना वाढीव वीज बिले देऊन महावितरण कंपनी त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहे, पण हे आम्ही चालू देणार नाही. वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांना मनस्ताप होत असल्याने राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा.



