वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या जनजागृती अभियानात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहभागी होणार ; पृथ्वीराज सुतार

पुणे : बालभारती पौड रस्ता, सुतारदरा (कोथरूड) ते पंचवटी (पाषाण) व जनवाडी (गोखलेनगर) हे दोन बोगदयांच्या कामासाठी वेताळ टेकडी फोडण्यात येणार आहे. या कामामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर हानी होणार असल्याने त्याला विरोध दर्शवण्यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समिती मार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला असून या बाबतची बैठक आज पार पडली असल्याची माहिती माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिली.
वेताळ टेकडी वाचविण्यासाठी दि. १५ एप्रिल रोजी सायं ५ वा वेताळबाबा चौक, ते जर्मन बेकरी असे वेताळ टेकडी बचाव कृती समिती मार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये पुणेकरांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी अभियानामध्ये सहभागी व्हावे यासाठी कृती समिती व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, गटनेते पृथ्वीराज सुतार, यांच्यात आज बैठक झाली.
यावेळी उपशहरप्रमुख आनंद मंजाळकर, विभागप्रमुख प्रविण डोंगरे उपस्थित होते, या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, माजी पर्यावरणमंत्री, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार, संपर्कप्रमुख आमदार सचिनजी अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली, वेताळ टेकडी बचाव मोहिमेला शिवसेना’ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे समर्थन देण्यात आले आहे. दि १५ एप्रिलच्या जनजागृती अभियानात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पृथ्वीराज सुतार यांनी दिली आहे.




