पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर 18 जखमी

पुणे: पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाला. मध्यरात्री दोन वाजता पुणे-बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 18 जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ट्रकने खाजगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही बस साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा अपघात झाला. चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ट्रकचालकाचा देखील मृत्यू झाल्याचं कळतं.
अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी अवस्थेत असलेल्या एकूण 18 जणांना पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.




