खडकवासला धरणात बुडून दोन मुलींचा मृत्यू

स्थानिकांनी पाच मुलींना सुखरूप बाहेर काढले
पुणे : पुण्यातील खडकवासला धरणामध्ये बुडून दोघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या आठ ते नऊ जणींपैकी काही मुली बुडाल्या होत्या. यापैकी दोघींचे मृतदेह सापडले आहेत.घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार नऊ मुली या खडवासला येथे लग्न कार्यासाठी आल्या होत्या. लग्न कार्यालयाचा मंडप हा धरणाच्या शेजारी होता. यावेळी खडकवासला धरणामध्ये मुली पोहण्यासाठी गेल्या असल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडत होत्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत. हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आहेत.







