महाराष्ट्रराजकीय

अजित पवारांची पहिल्यांदाच शरद पवारांवर जोरदार टीका ; तुम्ही कधी थांबणार म्हणत वयावर ठेवलं बोट..

मुंबई : दोन दिवसांपूर्वी बंड करत अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाले. या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांच्या या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि शरद पवार अजित पवार असे दोन गट तयार झाले. या फुटी नंतर आज दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत पार पडले.

अजित पवार यांनी घेतलेल्या सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच जोरदार टीका केली. शरद पवारांच्या राजकीय भूमिकांपासून ते वयापर्यंत अजित पवार घसरले. शरद पवार यांनी मुलीला राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी कसे प्रयत्न करत होते, याचीही त्यांनी माहिती उघड केली आहे.

शरद पवारांच्या वया विषयी बोलताना अजित पवार म्हणाले नोकरीनंतर माणूस 58 व्या वर्षी निवृत्त होतो. आयएएस असेल तर 60 व्या वर्षी निवृत्त होतो. भाजपने तर राजकारणातील निवृत्तीचं वय 75 केलं आहे. आमच्या हातात पक्ष द्या. निवृत्त व्हा मार्गदर्शन करा. तुम्ही सांगा ना. चुकलं तर चुकलं सांगा ना. आम्ही चूक दुरूस्त करून पुढे जाऊ. का हे केलं जातं? कशासाठी केलं जातं?आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
वय 82 झालं , 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही शतायुषी व्हा. मला सांगितलं राजीनामा देतो आणि संस्थेची कामे पाहतो. राजीनामा दिल्यावर एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर तुम्ही बसा. आणि बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो. तेही आम्हाला मान्य होतं. त्यानंतर दोन दिवसात सांगितलं राजीनामा मागे घेतला. मागे घेतला तर दिला कशाला? मी सुप्रियाला सांगितलं त्यांना सांग. ते हट्टी आहेत. पण असा कुठला हट्ट आहे. आमदारांना फोन केला जात आहे. ते भेटले नाही तर त्याच्या पत्नीला फोन करून भावनिक केलं जातं, असा गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

सोनिया गांधी परदेशी आहे, असं सांगितलं. परदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, असं सांगितलं. आम्ही ऐकलं. त्यानंतर राष्ट्रवादीचा जन्म झाला. चार महिन्यात निवडणुका लागल्या. त्यावेळी संपूर्ण मैदान गाजवण्याचं काम भुजबळ यांनी केलं. आर आर पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील, मी आम्ही सर्व तरुण होतो. काही तरी करावं आम्हाला वाटत होतं. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा होता. पण त्यावेळी आपल्याला फक्त 58 जागा मिळाल्या. काँग्रेसला राज्यात ताकदीचा नेता नसताना 78 जागा मिळाल्या. विलासराव मुख्यमंत्री झाले. आम्ही सत्तेत गेलो. कामे केली, असं त्यांनी सांगितलं.

मला फक्त सात जिल्ह्याचं खातं मिळालं. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे महाराष्ट्र जाणतो. मी जातीपातीचं नात्यागोत्याचं काम केलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करतो. पहाटे कामाला सुरुवात करतो. आजही करतो. महाराष्ट्र पुढे जावं म्हणून हे करत असतो. देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून मी काम करत असतो, असंही त्यांनी सांगितलं.

आपल्या भाषणात अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमने उधळली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची विकासाची घौडदौड सुरू असून २०२४ ला मोदींशिवाय पर्याय नाही असंही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर ही अजित पवार यांनी जोरदार टीका केली. आव्हाड यांच्यामुळे यांनी अनेकजणांनी पक्ष सोडल्याचे ते म्हणाले.

तुम्ही सभा घेतल्या तर मलाही सभा घ्यावा लागतील. मलाही बोलता येत, पण काही गोष्टी बाहेर येऊ नये असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये