पाषाण मधील बंद पडलेल्या संत गोरा कुंभार अनुदानीत शाळेची शिक्षण उपसंचालकांकडून पाहणी : ग्रामस्थांकडून घेतली सत्य परिस्थितीची माहिती..

पाषाण : पाषाण मधील नेहरू शिक्षण संस्था, पुणे संचलित गोरा कुंभार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक विद्यालय, या बंद पडलेल्या शासन अनुदानीत शाळेची शिक्षण उपसंचालक दाणी यांनी पाहणी केली व स्थानिक ग्रामस्थांकडून सत्य परिस्थिती जाणून घेतली. संस्थाचालकांकडून हेतुपुस्सर शाळा बंद करण्यात आली असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी शाळा सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांकडून संबधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर आजचा अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा पार पडला.
यावेळी शाळेतील आवारात शिक्षण उपसंचालकांनी ग्रामस्थांशी संवाद साधत शाळेच्या परिसराची स्थळ पाहणी केली व शाळेबद्दल सत्य परिस्थिती जाणून घेतली. यावेळी पुन्हा शाळा सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारे माजी नगरसेवक तानाजी निम्हण, शारदा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाषणकर, राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे राजाभाऊ सुतार, अजय निम्हण, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती सूर्यवंशी, गणेश कांबळे, सुरेश नारायण, माजी शिक्षक, प्राचार्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना तानाजी निम्हण यांनी चांगल्या पद्धतीने सुरू असलेली शाळा संस्थाचालकांकडून टप्याटप्याने कशी हेतुपुरस्सर बंद करण्यात आली. आणि त्यानंतर स्थानिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य कसे धोक्यात आले आहे ही परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडली. या शाळेतून शिकून अनेक विद्यार्थी मोठे झाले व वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत, पण आज शाळा बंद पडल्याने सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून शाळा सुरू होणे किती आवश्यक आहे हे निम्हण यांनी सांगितले.
इतर ग्रामस्थांनीही अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडत शाळा सुरू व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली. शाळेचे खोटे रेकॉर्ड कसे तयार करण्यात आले याचीही माहिती उपसंचालकांना यावेळी देण्यात आली.
शिक्षण उपसंचालक दाणी यांनी शाळेच्या वर्ग खोल्या, स्वच्छ्ता गृह, पाण्याची व्यवस्था याची पाहणी केली असून याचा स्थळ पाहणी अहवाल लवकरच तयार केला जाणार असल्याचे सांगितले.



शाळा सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांचा लढा
पाषाण मधील नेहरू शिक्षण संस्था, पुणे संचलित गोरा कुंभार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक विद्यालय, शाळा संस्था चालकांनी विशिष्ठ हेतूने बंद करण्यात आली असल्याने स्थानिक पाषाण परिसरातील सर्वसामान्य घरातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या शाळा सुरू झालीच पाहिजे यासाठी लढा उभारला आहे. या संदर्भात सुरू केलेल्या पाठपुराव्याला यश येताना दिसत असून मागील पंधरा दिवसांपूर्वीच शाळा बंद प्रक्रियेचे चौकशीचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य अवर सचिव आ.रा.राजपूत यांनी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिले होते. या आदेशानंतर या प्रक्रियेला गती मिळताना दिसत आहे.
शाळा सुरू करण्यासाठी माजी विद्यार्थी, पालक यांची झालेली सह्यांची मोहीम, संबधित विभागाकडे केलेला पाठपुरावा याला यश मिळत आहे. आज अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली आहे. स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ही शाळा लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.
या शाळा सुरू व्हाव्यात यासाठी पाषाण मधील माजी नगरसेवक तानाजी निम्हण व ग्रामस्थ यांनी पुढाकार घेत घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेला ही माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या लढ्याला आणखीनच बळ मिळाले आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत याबाबत शासनाच्या शैक्षणिक संबधित सर्व विभागांकडे तक्रार अर्ज करत पाठपुरावा केल्याने अखेर चौकशीचे आदेश निघाले व आज शिक्षण उपसंचालकांकडून स्थळ पाहणी ही करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.









