पुण्यातून मुरलीधर मोहोळच फायनल, भाजपच्या दुसऱ्या यादीत मोहोळांचे नाव जाहीर

Pune पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून पुण्यातून लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ(muralidhar mohol) यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची घोषणा आज करण्यात आली आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कडून कोणाचे नाव जाहीर होणार याची मोठी उत्सुकता होती. अखेर पहिल्यापासून चर्चेत असलेले मोहोळ यांचेच नाव जाहीर झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गेल्या दोन तीन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या यादी ची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर आज भाजपनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. पुण्यात भाजप कडून मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, सुनिल देवधर हि तीन नावे चर्चेत होती. भाजप नेतृत्वाने अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्षात सक्रीय असलेले मुरलीधर मोहोळ यांचे नाव लोकसभा उमेदवार म्हणून सुरवातीपासूनच आघाडीवर होते. भाजपकडून आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.मोहोळ यांनी भाजप कार्यकर्ता, शिक्षण मंडळ सदस्य, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून कामाचा ठसा उमटवला आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष व त्यांनतर महापौर म्हणून काम करत असताना पुणे शहराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयामुळे ते शहराच्या प्रत्येक भागात पोहोचले. कोरोना सारख्या संकट काळात ही त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले गेले. या कामांमुळे त्यांचे नाव शहराच्या प्रत्येक घरा घरात गेले. त्यामुळेच खासदारकीचा उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा पहिल्यापासून झाली आणि आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.










