कोथरूडमध्ये तुळजाभवानी मंदिर टेकडीवर गोडाऊनला भीषण आग..

कोथरूड : कोथरुड, पौड रोड, तुळजाभवानी मंदिर, टेकडीवर मंडपाच्या साहित्याच्या गोडाऊनला आज भीषण आग लागली. या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाचे पाच बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

ही आग एवढी मोठी होती की लांबूनच धुराचे मोठे लोट दिसत होते. त्यामुळे या आगीची चर्चा सर्वत्र पसरली. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या आगीमुळे तुळजाभवानी मंदिर टेकडीवर झालेल्या अनधिकृत गोदामांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.



मंडपाच्या गोडाऊन लागलेली आग कोथरूड, एरंडवणा, सिंहगड रोड अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत अर्धा तासात आटोक्यात आणली. आगीचे नक्की कारण समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी राजेश जगताप यांनी सांगितले. गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने आग लागल्याची चर्चा होती पण तसे आवशेष सापडले नसल्याचे त्यांनी सांगितले.






