मुरलीधर मोहोळ यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंहाचा वाटा..

राष्ट्रवादीच्या मजबूत पक्ष संघटनेचा महायुतीला फायदा
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाचाही मोठा वाटा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी म्हंटले आहे.
विजयानंतर मोहोळ यांचा शिंदेशाही पगडी घालत दीपक मानकर यांनी सन्मान केला तर दीपक मानकर यांची गळा भेट घेत मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष पद मिळाल्यानंतर दीपक मानकर यांनी मजबूत पक्ष बांधणी करत शहरातील प्रत्येक भागामध्ये कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. शहराध्यक्ष होतच शहरातील पहिली जम्बो कार्यकारणी जाहीर करत पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर शहरभर प्रत्येक भागात तयार केली. त्याचा या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना फायदा झाल्याचे दिसत आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारादरम्यान दीपक मानकर यांनी आपली पूर्ण यंत्रणा कामाला लावली. समाजाचे मेळावे, पक्षातील प्रत्येक सेलचे मेळावे घेत त्यांनी महायुतीचे व पक्षाचे काम मतदारांपर्यंत पोहोचून मोहोळ यांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते. त्यांनी आपला पूर्ण मित्र परिवार प्रचार यंत्रणेत कामाला लावला होता. दीपक मानकर यांच्या आदेशानुसार भाजपच्या खंद्याला खांदा लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही तेवढेच जोमाने काम केल्याने मुरलीधर मोहोळ यांना शहरातून मोठे मताधिक्य मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. दीपक मानकर यांनी लावलेल्या यंत्रणेमुळे शहरातील वस्ती विभागातूनही मोहोळ यांना मतदान पडले. मानकर यांच्या प्रभागातूनही मोहोळ यांना ६७०० चे लीड मिळालेले आहे.
या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीतही पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप उत्तम कामगिरी करेल व यश संपादित करेल असा विश्वास दीपक मानकर यांनी व्यक्त केला आहे.





















