पुणे शहर

हॉटेल व बार प्रमाणे इतर दुकाने सुद्धा रात्री १० पर्यंत चालू ठेवण्याची परवानगी द्या : धुमाळ

पुणे : पुणे शहरातील हॉटेल आणि बार खुले करण्यास राज्य सरकारने सोमवार दि. ५ ऑक्‍टोबरपासून रितसर परवानगी दिली आहे. महानगरपालिकेने त्यांना रात्री दहा वाजेपर्यंत मंजुरी दिली आहे. मॉलमधील दुकानेही रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल असे महानगरपालिकेने म्हटले आहे. मात्र किराणामाल, भाजीपाला, फळे, कपडे, सोने-चांदी, इलेक्ट्रिकल, वस्तू, वाहनांचे सुटे भाग, जनरल स्टोअर आधी विविध प्रकारचे  दुकाने सायंकाळी ७ पर्यंतच खुले ठेवण्यास महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे या दुकानांना देखील रात्री दहा पर्यंत परवानगी देण्यात यावी अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.  सध्या सणासुदी निमित्ताने धार्मिक व्रत-वैकल्य होतात. तसेच दि.१७ ऑक्टोंबर पासून नवरात्र सुरू होत आहे. १४ नोव्हेंबर पासून दीपावली सुरू होत आहे. गेले सात महिने नागरिक घरातच आहेत. आता सणासुदीमुळे ते बाजारपेठेत येण्यास सुरुवात झालेली असताना दुकाने मात्र सायंकाळी सातला बंद करण्याच्या निर्णयामुळे व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

जनजीवन सुरळीत होण्याच्या दिशेने शासकीय व खासगी कार्यालयात सध्या उपस्थिती वाढू लागली आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या चे प्रमाण सुध्दा वाढले आहे.  लग्न समारंभांनाही काही अंशी सवलत दिलेली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने  दुकानांना नेहमीप्रमाणेच म्हणजे रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्याची गरज आहे.

हॉटेल आणि बार खुले दुकाने मात्र बंद ही भूमिका योग्य आहे का? असा प्रश्न धुमाळ यांनी उपस्थित केला आहे. नागरिक दिवसभर त्यांच्या नोकरी-व्यवसायात व्यस्त असतात व सायंकाळी वेळ मिळाल्यावर त्यांना खरेदी करण्यासाठी दुकाने मात्र उघडी नसतात. वेळेच्या बंधनामुळे व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. तरी  हॉटेल व बार प्रमाणे इतर आवश्यक असलेली दुकाने सुद्धा रात्री १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावीत, तसेच सदर दुकाने ही राज्य शासनाच्या नियम व अटी नुसार खुली करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये